‘झुरळझेप’ नव्हे, ‘गरुडभरारी’!

    दिनांक :31-May-2026
Total Views |
रोखठोक. . .
दिनेश गुणे
youth energy ऊर्जेचा एक नियम असतो. ती साठवून ठेवून गरजेप्रमाणे वापरता येत नाही. ती निर्माण होताच वापरली नाही तर वाया जाते. तरुणाई हीदेखील एक ऊर्जाच असते. केवळ वाढते वय म्हणजे तरुणाई नव्हे. या वयाबरोबर ऊर्जादेखील वाढत असते. मन विकसित होत असते. नवनव्या गोष्टींमध्ये रस निर्माण होत असतो, नवनव्या गोष्टी करून पाहण्याची ऊर्मी उफाळून येत असते आणि त्याला वाट करून दिली नाही तर तिचा उद्रेक होतो. तरुणाईची ऊर्जा अशी विस्फोटाच्या दिशेने वाया जाऊ द्यायची नसेल तर तिचा वेळीच विधायक वापर व्हायला हवा. अन्यथा, या ऊर्जेच्या वारूवर कोणीही स्वार होईल आणि या वारूचा लगाम व्यवस्थित हाताळता आला नाही तर तो बेफाम उधळून भलत्याच दिशेला भरकटत जाईल हीच भीती अधिक असते. तरुणाईला ऊर्जेच्या वारूवर स्वार होण्याची उत्सुकता असते, पण लगाम आणि मांड यांवर ‘कमांड’ नसेल, तर फसलेल्या दिशेला वळणारा वारू विध्वंसासही कारणीभूत ठरू शकतो, हे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे.

youth energy
भारत हा तरुणाईच्या ऊर्जेने संपन्न असलेला देश आहे. या देशातील 65 टक्के लोकसंख्या तरुण वयोगटातील म्हणजे पस्तिशीच्या आतील असल्यामुळे या देशात तरुणाईच्या ऊर्जेची कमतरता नाही आणि ही ऊर्जादेखील सतत काही वेगळ्या वाटांचा शोध घेणारी आहे. त्यामुळे तिचा योग्य आणि वेळीच वापर करून घेणे हे समाज आणि व्यवस्थांसमोरील मोठे आव्हान आहे. या तरुणाईने आपली क्षमता सिद्ध केली आहे, बुद्धिमत्तेच्या स्पर्धेत जगाच्या तुलनेत कोठेही मागे नाही याचे अनेक पुरावेही दिले आहेत, म्हणूनच तरुणाईच्या ऊर्जेला नेमकी आणि विधायक दिशा देण्याचे नवनवे प्रयत्न देशात सुरू असतात. या तरुणाईच्या काही अपेक्षाही आहेत. त्या वास्तव आहेत यात शंका नाही. ही ऊर्जा देखील साठवून ठेवता येणार नसल्याने तिचा वेळीच वापर व्हावा ही यापैकी महत्त्वाची वास्तविक अपेक्षा आहे.
सुमारे सात वर्षांपूर्वी, डिसेंबर 2019 मध्ये आपल्या अखेरच्या जनसंवादाच्या जाहीर कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वाचा मुद्दा चिंतनासाठी देशासमोर ठेवला होता. एका परीने पुढच्या दशकाचे भाकीतच त्यांनी वर्तविले होते. 21 व्या शतकात जन्मलेली पिढी देशाच्या विकासाला गती देण्यात सक्रिय भूमिका बजावणारी असल्याने, शतकासमोर असलेली असंख्य आव्हाने समजून घेत त्यांची मने विकसित होत होती. या पिढीलाच आजच्या, नवयुगाच्या भाषेतील ‘मिलेनियल्स’ म्हणून ओळखले जाते, तर काही जण त्यांना ‘जनरेशन झी’ किंवा ‘जेन झी’ म्हणतात. व्यापक अर्थाने, समाजमाध्यमांनी विकसित केलेली ही ‘सोशल मीडिया जनरेशन’ प्रतिभावान आहे आणि संवेदनशीलही आहे. समाजमाध्यमी मंचांवरून व्यक्त होणारे तिच्या प्रतिभेचे आविष्कार समाजव्यवस्थेला कधी चिंतन, तर कधी चिंतादेखील व्यक्त करण्यास भाग पाडतात. काहीतरी नवीन, वेगळे करण्याचे तिचे स्वप्न असते. तिची स्वतःची मतेही असतात आणि व्यवस्थेकडे लक्षदेखील असते. या पिढीला व्यवस्थेचा तिटकारा असतो किंवा ती व्यवस्था उलथून टाकण्याच्याच मानसिकतेत नेहमी असते असा याचा अर्थ नाही. उलट व्यवस्थेचे प्रामाणिक पालन करण्याचीच त्यांची इच्छा असते. या मानसिकतेस व्यवस्थेकडून प्रामाणिक प्रतिसाद त्यांना अपेक्षित असतो आणि तसा प्रतिसाद मिळाला नाही, तर मात्र ही पिढी अस्वस्थ होते. धैर्याने व्यवस्थेवर प्रश्नचिन्हे उमटवते, व्यवस्थेविरोधात दंड थोपटून उभीदेखील राहते आणि त्याला व्यापक जनआंदोलनाचे रूप देते. समाजमाध्यमांचे शक्तिशाली मंच अशा आंदोलनांमुळे उभे राहिलेले आजकाल जगातील अनेक आंदोलनांमधून दिसून आले आहे. त्यामुळे व्यवस्थेच्या विरोधातील त्यांची भूमिकादेखील विधायकच मानली जाते आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची प्रामाणिक दखल घेऊन त्याची उत्तरे शोधणे ही व्यवस्थेची जबाबदारी असते. कारण व्यवस्थेची घडी बिघडली, तर अराजकता निर्माण होते. या अराजकतेचा आणि अव्यवस्थेचा ‘जेन-झी’ला तिरस्कार आहे. अव्यवस्था आणि अस्थिरता याबद्दल त्यांच्या मनात प्रचंड चीड आहे. आसपासच्या सहजपणे घडून जाणाèया घटनांमधूनही ते दिसून येते. बस थांब्यावर, विमानतळावर, सिनेमा थिएटरमध्ये किंवा कोठेही, कोणी रांगेत उभे असताना मध्येच एखादा घुसला, तर सर्वांत आधी आवाज उठवणारे तरुणच असतात. आणि अशी एखादी घटना घडली, तर इतर तरुण लगेच मोबाईल फोन काढून त्याचा व्हिडीओ बनवतात आणि पाहता पाहता तो व्हिडीओ व्हायरलही होऊन जातो. यामुळे चूक करणाèयालाही आपण काय केले याची जाणीव होते! थोडक्यात, पठडीबाज पद्धतीऐवजी एक नवीन प्रकारची व्यवस्था, नवीन प्रकारचे युग, नवीन प्रकारची विचारसरणी आणि व्यवस्थेची नव्या युगाला अनुसरून असलेली नवी घडी ही या पिढीची अपेक्षा आहे.
ऊर्जा आणि गतिशीलतेने भारलेली मने नेहमी तरुणच असतात. बदल घडवून आणण्याची शक्ती आणि मानसिकता अशा मनांमध्येच असते. त्यामुळे, ही पिढी आपल्या तारुण्याचा कसा वापर करते यावर त्यांचे भविष्य आणि जीवन अवलंबून असते, अशी स्वामी विवेकानंदांची भावना होती. युवा पिढीने समृद्ध असलेल्या कोणत्याही देशात, कल्पना आणि नावीन्यपूर्ण संशोधन, जोखीम घेण्याची तयारी आणि हाती घेतलेले कोणतेही काम पूर्ण करण्याची असीम जिद्द या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. कोणत्याही विपरीत परिस्थितीने समोर उभी केलेली आव्हाने पेलण्याची हिंमत या पिढीच्या अंगी असलेल्या ऊर्जेतून ओसंडत असते. कोविडसारख्या जीवघेण्या महामारीच्या संकटात याचा अनुभव देशाने घेतला असल्याने, आव्हाने झेलून परतविणे हा या पिढीसाठी चमत्कार नव्हे, तर सहजसाध्य खेळ असतो.
तरुणाईच्या प्रतिभेचे नवी क्षितिजे उजळणारे ‘स्टार्ट अप’ नावाचे एक क्षेत्र भारतात झपाट्याने उदयास आले आहे. स्टार्टअपच्या जागतिक युगाचे नेतृत्व करण्याची क्षमता भारताच्या तरुणाईमध्ये आहे, हे आता सिद्ध होऊ लागले आहे. वर्षानुवर्षे भारतात स्टार्टअपमध्ये विक्रमी गुंतवणूक होत असल्याने हे क्षेत्र वेगाने पुढे जात आहे. लहानमोठ्या शहरांतही या क्षेत्राची व्याप्ती पसरू लागली आहे. आजकाल जगात सर्वाधिक चर्चेत असलेल्या युनिकॉर्नच्या जगातही भारत वेगाने भरारी घेत आहे. सात हजार कोटी रुपयांहून अधिक किमान मूल्य असलेल्या या क्षेत्रात दहा वर्षांपूर्वी जेमतेम नऊ-दहा युनिकॉर्न होते. आता प्रत्येक दहा दिवसांमागे एका नव्या युनिकॉर्नची निर्मिती होत आहे. हा आश्चर्यजनक वेग म्हणजे, तरुणाईची केवळ ‘झुरळझेप’ नव्हे, तर ‘गरुडभरारी’ म्हणावी लागेल. या वाढीचे आणखी एक वेगळेपण सांगितले जाते.youth energy ते म्हणजे, आपल्या देशातील युवकांनी हे यश कोविड महामारीच्या काळात प्राप्त केले आहे. आज भारतातील अनेक युनिकॉर्ननी एक अब्जाहूनही अधिक मूल्यांचा टप्पा पार केला आहे आणि देश-विदेशातून या क्षेत्राला मोठा पाठिंबा मिळत आहे.
जेन झी पिढीच्या या क्रांतीचे आणखी एक वेगळेपण अलिकडे अधोरेखित होताना दिसते. 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेली ही पिढी आजकाल केवळ सोशल मीडियावर मत व्यक्त करणारी पिढी राहिलेली नाही; ती सरकारे बदलवू शकणारी राजकीय शक्ती बनली आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंधने, हवामान संकट, सामाजिक न्याय आणि डिजिटल स्वातंत्र्य या प्रश्नांवर या पिढीने अनेक देशांत प्रस्थापित सत्तांना हादरे दिले. जगातील अनेक देशांत या पिढीने व्यवस्था उलथवून टाकल्या. नव्या व्यवस्थांचा उदय झाला. यामागे या पिढीच्या निश्चित अशा काही अपेक्षा होत्या. मोठ्या अपेक्षांनिशी प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या या पिढीने परिवर्तने घडवून आणली, पण त्यानंतर त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या का, हा प्रश्न शिल्लक राहिलेला आहे. कारण, जगात ज्या ठिकाणी असे परिवर्तन घडले, तेथील आजचे वास्तव फारसे आशादायक नाही असेच दिसते.
रस्त्यावरच्या संघर्षातून सत्तापालट घडवून आणणे तुलनेने सोपे असते, ज्या अपेक्षाभंगामुळे असंतोष उफाळलेला असतो, त्या अपेक्षांचे पूर्तता करणे आणि असंतोषाची कारणे दूर करणे अत्यंत कठीण असते. कारण तरुणाईचा हा असंतोष केवळ एखाद्या नेत्याविरुद्ध नव्हे, तर संपूर्ण आर्थिक-सामाजिक व्यवस्थेविरुद्ध होता, हे त्या त्या घटनांतून स्पष्ट दिसते. त्यामुळे, व्यवस्था बदलण्यासाठी घोषणांपेक्षा संस्थात्मक सुधारणा आवश्यक असतात, हेच वर्तमानाचे वास्तव आहे. याची उदाहरणे जगातील जेन झीच्या आंदोलनानंतरच्या परिस्थितीतून स्पष्ट झाली आहेत. बांगलादेशात विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी आरक्षण आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात उग्र आंदोलन उभारले. परिवर्तनानंतर नव्या सत्ताधाऱ्यांनी डिजिटल स्वातंत्र्य, रोजगारनिर्मिती आणि शिक्षणसुधारणा यांची आश्वासने दिली. काही प्रमाणात पोलिस कारवाईवरील नियंत्रण, ऑनलाईन अभिव्यक्तीवरील निर्बंध कमी करणे आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन अशी पावले उचलली गेली. मात्र वस्त्रोद्योगावर अवलंबून अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करू शकलेली नाही. महागाई आणि युवक बेरोजगारी कायम आहे. त्यामुळे आंदोलनातील ऊर्जा आता, व्यवस्था बदलली; पण वास्तविक जीवन बदलले का, या विचाराने अस्वस्थ झाली आहे.
श्रीलंकेतील 2022 मधील जेन झीच्या आंदोलनाचेही तेच झालेले दिसते. या आंदोलनाने सरकार बदलले, पण अर्थव्यवस्थेत काही फरक पडलाच नाही. या आंदोलनाची उभ्या जगाने दखल घेतली. तरुणाईच्या अपेक्षांचे आणि रोषाचे उग्र दर्शन घडविणाèया या आंदोलनातून इंधनटंचाई, महागाई आणि आर्थिक अस्थिरतेची चिंता ऐरणीवर आली आणि तरुणांनी राष्ट्राध्यक्षांना पदत्यागास भाग पाडले. नंतरच्या सरकारांनी आयएमएफ करार, करसुधारणा, भ्रष्टाचारविरोधी चौकशा आणि प्रशासनिक पारदर्शकतेची भाषा केली. काही आर्थिक स्थैर्य आलेही; पण तरुणांना अपेक्षित असलेली रोजगारक्रांती किंवा राजकीय संस्कृतीतील आमूलाग्र बदल घडले नाहीत. उलट काटकसरीच्या धोरणांमुळे तरुणांवर आर्थिक ताण वाढला.
यातून एक गोष्ट स्पष्ट झाली. ती म्हणजे, रस्त्यावरची क्रांती सशक्त असते. तीमधून तरुणांच्या अपेक्षा सज्जडपणे व्यक्त होतात आणि तिच्या दबावामुळे सरकारे बदलू शकतात. पण व्यवस्थेची बिघडलेली घडी त्यानंतर तातडीने बदलता येत नाही. आंदोलनासारख्या उपायांनी कर्जबाजारी अर्थव्यवस्था काही महिन्यांत बदलत नाही. चिली नावाच्या टिकलीएवढ्या देशातही शिक्षणखर्च, विषमता आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध पेटलेल्या तरुणांच्या आंदोलनातून डाव्या विचारांचे तरुण नेतृत्व सत्तेत आले. विद्यार्थिदशेत आंदोलन करणारे गॅब्रिएल बोरिक नवे राष्ट्राध्यक्ष झाले. नव्या सरकारने किमान वेतनवाढ, सामाजिक सुरक्षा, महिलांचे अधिकार आणि पर्यावरणीय धोरणांवर भर दिला. पण आर्थिक मंदी, संसदीय विरोध आणि लोकांच्या अतिउच्च अपेक्षा यामुळे बदलांचा वेग कमी पडला. नव्या संविधानाचा मसुदाही जनतेने नाकारला आणि आंदोलनातून जन्मलेल्या या क्रांतीने अपेक्षाभंगाची निराशाच जनतेच्या पदरी पडली. आंदोलनातील आदर्शवाद आणि सत्तेतील व्यवहारवाद या दोन बाबी भिन्न असतातच. पण आदर्शवादाच्या दबावामुळे सत्तेतील व्यवहारवाद तातडीने नमते घेतोच असे नाही. उलट, या दोहोंमध्ये संघर्ष होण्याचीच शक्यता अधिक असते. फ्रान्समध्ये पेन्शन सुधारणा, महागाई आणि बेरोजगारीविरोधात तरुण मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले. मात्र येथे पूर्ण सत्तापालट झाला नाही. तरीही सरकारला काही सामाजिक सवलती, रोजगार प्रशिक्षण योजना आणि हरित उद्योगांत गुंतवणूक वाढवावी लागली. तरीही, फ्रान्समधील तरुणांमध्ये राजकीय व्यवस्थेविरुद्धची नाराजी शमलेली नाही. संपूर्ण युरोपातच, उजव्या आणि डाव्या टोकाच्या राजकारणाकडे तरुणांचा ओढा वाढण्यामागे हेच कारण मानले जाते. ट्युनिशिया, इजिप्त, लिबियासाख्या देशांत तरुणाईने हुकूमशाहीविरुद्ध उठाव केले. सुरुवातीला लोकशाहीची आशा निर्माण झाली; पण अनेक ठिकाणी पुन्हा लष्करी नियंत्रण, यादवी संघर्ष किंवा आर्थिक अस्थिरता निर्माण झाली. कारण आंदोलनाने सत्ता उलथवली, पण मजबूत लोकशाही संस्था निर्माण केल्या नाहीत.
म्हणजे, जेन झीच्या अपेक्षांचे वेग आणि अपेक्षापूर्ती करण्यातील व्यवस्थांचा वेग वेगळा असतो, असा याचा स्पष्ट अर्थ आहे. सोशल मीडियाच्या युगाला तत्काळ बदल अपेक्षित असतो. पण अर्थव्यवस्था, रोजगार आणि शिक्षणव्यवस्था बदलण्यासाठी काही काळ जावाच लागतो. ‘जेन झी’ने परिवर्तन घडविलेल्या देशांतील अनेक देश कर्जबाजारी, महागाईग्रस्त किंवा जागतिक बाजारावर अवलंबून आहेत. त्यामुळे सरकारे लगेच रोजगारनिर्मिती करू शकत नाहीत. त्यामुळे, बदल हवा अशी या पिढीची तातडीची मागणी असली, तरी सत्तेतील हितसंबंध सांभाळण्याच्या कसरतीत त्याचा प्राधान्यक्रम कदाचित मागेदेखील पडतो. असंतोषातून सत्तापालट होतो, पण अपूर्ण अपेक्षांतून पुन्हा असंतोष जन्म घेतो. आणि मग समाज एका कायमस्वरूपी अस्थिर चक्रात अडकतो, हेच अनेक आंदोलनांतून दिसून येते. त्यामुळे केवळ आंदोलनांसाठी ताकद देणे ही तरुणाईची गरज नाही, तर या पिढीमध्ये भविष्याविषयीचा विश्वास रुजविणे हे खरे आव्हान आहे. भारतात ते शक्य आहे, कारण येथील जेन झी ही व्यवस्था ‘मोडीत काढण्याच्या’ विचाराची नाही, तर व्यवस्था ‘सुधारण्याच्या’ विचाराची आहे. आवाज वाढविण्यापेक्षा, विचाराची आणि तर्काची ताकद वाढविण्यावर या पिढीचा विश्वास आहे. समंजसपणा, संवाद आणि सहकार्यातूनही बदल घडविता येतात, हे या देशाने अनुभवलेले आहे. या संस्काराचे बाळकडू घेऊनच येथील ‘जेन झी’ घडते आहे.