देशातील 166 जलाशयांत 24 टक्केच पाणीसाठा

    दिनांक :31-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
India water reservoir levels, बहुतांश राज्यात तापमानाने उच्चांक गाठला असताना, देशातील जलाशयांमध्ये पाण्याचा साठा झपाट्याने कमी होत असल्याचे समोर आले. मे महिन्यांतच देशातील 166 जलाशयातील साठ्यात 21.411 अब्ज घनमीटरने घसरण होऊन त्यात केवळ 24.75 टक्के पाणी आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत देशातील प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी वेगाने खाली घसरली असून, 15 धरणांतील साठा सामान्यापेक्षा अर्ध्यावर आला आहे.
 

India water reservoir levels 
 
 
केंद्रीय जल आयोगाने जारी केलेल्या रविवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील 166 प्रमुख जलाशयांमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत एकूण साठा कमी होऊन 45.419 अब्ज घनमीटर (बिलियन क्यूबिक मीटर) झाला आहे, जो त्यांच्या एकूण क्षमतेच्या केवळ 24.75 टक्के आहे. मे महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात या जलाशयांमध्ये 66.830 अब्ज घनमीटर पाणी होते, जे एकूण क्षमतेच्या 36.41 टक्के होते. याचा अर्थ असा की, एका महिन्यातच उष्णता आणि मोठ्या वापरामुळे देशातील मुख्य जलस्रोतांतून सुमारे 21.411 अब्ज घनमीटर पाणी कमी झाले. मोसमी पाऊस लांबणीवर गेल्यास देशात पाण्याचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आयोगाने व्यक्त केली आहे. सध्याचा साठा गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा आणि गेल्या दहा वर्षांच्या सरासरीपेक्षा थोडा चांगला आहे, परंतु वेगाने रिकामी होणारी धरणे मोठे आव्हान निर्माण करत आहेत.
 
अनेक जलाशये कोरडे
देशाच्या काही भागांमध्ये परिस्थिती इतकी भीषण आहे की, तेथील मोठे धरणे पूर्णपणे कोरडी झाली आहेत. महाराष्ट्रातील भीमा उज्जैनी धरण आणि बिहारमधील चंदन धरण यांसारखे जलाशय मे महिन्याच्या सुरुवातीलाच पूर्णपणे कोरडे झाले आणि तेथे पाण्याची पातळी शून्य टक्के नोंदवली गेली आहे.
 
 
जलविद्युत प्रकल्पांवर परिणाम
जलसाठ्याच्या मोठ्या घसरणीचा थेट परिणाम देशाच्या वीज उत्पादनावरही होऊ शकतो. देशातील 8 जलविद्युत प्रकल्पांशी संबंधित तलावांत मे महिन्याच्या सुरुवातीला पाण्याची पातळी सामान्यापेक्षा कमी होती, तर आता 6 मोठ्या तलावांत अतिशय कमी साठा उपलब्ध आहे. मे महिन्यात पारा वाढल्याने तलावांमधील पाण्याची पातळी वेगाने खाली आली. देशातील 112 धरणांमध्ये पाण्याची पातळी सामान्यापेक्षा कमी आहे.
कर्नाटक, आंध्रमध्ये पाणीबाणी
पाण्याच्या टंचाईचे सर्वात भीषण चित्र दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे, जिथे पाण्याची पातळी किमान स्तरावर आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला यामध्ये एकूण क्षमतेच्या 26.83% पाणी शिल्लक होते, जे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या अहवालात घसरून केवळ 17.55% राहिले आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यांमध्ये पाण्याची टंचाई सर्वाधिक आहे.