लाडकी बहीण योजनेतील 80 लाख महिला अपात्र!

    दिनांक :31-May-2026
Total Views |
मुंबई,
Ineligible for Ladki Bahin Scheme मुंबईतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम मुदत संपल्यानंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 80 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. महिला व बालविकास विभागामार्फत राबवली जाणारी ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला सुमारे 2 कोटी 46 लाख महिला या योजनेचा लाभ घेत होत्या. मात्र ई-केवायसी पडताळणीनंतर ही संख्या आता सुमारे 1 कोटी 66 लाखांवर आली आहे.
 
 
Ineligible for Ladki Bahin Scheme
 
योजनेच्या अटींनुसार लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच इतर पात्रता निकषही लागू करण्यात आले आहेत. पात्र लाभार्थ्यांची अचूक ओळख पटावी यासाठी ई-केवायसी मोहीम राबवण्यात आली होती. काही महिलांनी प्रक्रिया पूर्ण न केल्याने तर काहींनी चुकीची माहिती भरल्याने मोठ्या प्रमाणात अपात्रता समोर आली आहे. दरम्यान, योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 500 रुपये दिले जातात. लाभार्थ्यांची संख्या घटल्यामुळे योजनेवरील आर्थिक भारही कमी होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मे महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.