पुणे,
IT Company in Hinjewadi Shuts Down पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातून मोठी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंजवडी फेज-2 मधील ‘थिंक टेक्नॉलॉजी इंडिया’ ही आयटी कंपनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बंद करण्यात आली असून, यामुळे शेकडो कर्मचाऱ्यांचे रोजगार धोक्यात आले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने रातोरात आपले कार्यालय बंद करून टाळे ठोकले आहे. यामुळे तब्बल 700 हून अधिक सॉफ्टवेअर इंजिनिअर्स आणि फ्रेशर्स अचानक बेरोजगार झाले आहेत. या घटनेमुळे पुण्याच्या आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

कंपनी गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीत असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर दिले जात नव्हते आणि कंपनीने दिलेले काही चेक्स बँकेत बाऊन्स झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आधीपासूनच अस्वस्थता होती.याशिवाय, नोकरीवर घेताना कर्मचाऱ्यांकडून लॅपटॉपच्या नावाखाली सुमारे 15,000 रुपयांची सिक्युरिटी डिपॉझिट रक्कम घेतली गेली होती. मात्र कंपनी अचानक बंद झाल्याने ही रक्कमही परत न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे शेकडो तरुणांच्या करिअरवर अनिश्चिततेचे सावट आले असून, पुण्याच्या आयटी क्षेत्रात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.