सरकार-जरांगे चर्चेला यश;जरांगे पाटील यांचे उपोषण मागे

    दिनांक :31-May-2026
Total Views |
जालना,
Jarange Patil Calls Off Hunger Strike मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मध्यरात्री आपले उपोषण मागे घेतले आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या दीड तासांच्या चर्चेनंतर दोन्ही बाजूंमध्ये सकारात्मक तोडगा निघाल्याने हा निर्णय घेण्यात आला.कडक उन्हात आणि कोणत्याही मंडपाशिवाय सुरू असलेल्या उपोषणामुळे जरांगे पाटील यांची तब्येत बिघडू लागली होती. उपोषणस्थळी त्यांना उलट्यांचा त्रास झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याचदरम्यान राज्य सरकारचे शिष्टमंडळ अंतरवली सराटीत दाखल झाले आणि चर्चेची प्रक्रिया सुरू झाली.
 
 
 
real
 
सुरुवातीला सरकारकडून आणलेला मसुदा जरांगे पाटील यांनी स्वीकारला नव्हता. त्यामुळे तोडगा न निघाल्याने तणाव वाढला होता. मात्र त्यानंतर गावातील सरपंच पांडुरंग तारख यांच्या घरी आरक्षण अभ्यासक, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्यात सविस्तर बैठक झाली. या चर्चेनंतर सुधारित निर्णय घेऊन शिष्टमंडळ पुन्हा जरांगे पाटील यांच्याकडे गेले आणि अंतिम चर्चा झाली.या चर्चेनंतर अखेर मध्यरात्री जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. सरकारसोबत झालेल्या चर्चेमुळे आंदोलनावर तात्पुरता तोडगा निघाल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सरकारसमोर विविध मागण्या ठेवल्या होत्या. यामध्ये मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे, आंदोलनातील गुन्हे मागे घेणे, बलिदान देणाऱ्या कुटुंबांना नोकरी देणे, सारथी योजना पुन्हा सुरू करणे, प्रलंबित महामंडळाचे परतावे देणे आणि जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया सुलभ करणे यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता. दीर्घ चर्चा आणि राजकीय हालचालींनंतर अखेर उपोषण मागे घेतल्याने मराठा आंदोलनाच्या पुढील टप्प्याबाबत आता सर्वांचे लक्ष सरकारच्या पुढील निर्णयांकडे लागले आहे.