लडाखमध्ये दारू विक्रीचे नियम झाले शिथिल

    दिनांक :31-May-2026
Total Views |
लेह,
Liquor Sale Regulations Relaxed in Ladakh लडाख प्रशासनाने मद्यविक्री आणि उत्पादन शुल्क व्यवस्थेत मोठे बदल करत नवीन उत्पादन शुल्क धोरणाला मंजुरी दिली आहे. उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या मान्यतेनंतर हे धोरण लागू करण्यात आले असून, यामागचा उद्देश अवैध दारू आणि अमली पदार्थांच्या वापराला आळा घालणे, पर्यटनाला चालना देणे आणि महसूल वाढवणे हा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत लडाखमधील अधिकृत दुकानांमध्ये मुख्यतः बिअर, वाईन आणि काही मर्यादित पेये उपलब्ध होती. त्यामुळे अनेक पर्यटक आणि स्थानिक नागरिक इतर राज्यांतून मद्य आणत असल्याचे दिसून येत होते. यामुळे तस्करी आणि बेकायदेशीर विक्रीच्या घटनाही वाढत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नव्या धोरणाची आखणी केली आहे.
 
 

n Ladakh 
 
नवीन धोरणानुसार आता किरकोळ विक्री केंद्रांमध्ये विदेशी मद्य तसेच इंडियन मेड फॉरेन लिकर विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय, होमस्टे, गेस्ट हाऊस आणि काही पर्यटन व्यवसायांनाही परवाना शुल्क भरून मद्यविक्रीची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच मायक्रो-ब्रुअरी असलेल्या बिअर बार सुरू करण्यालाही पहिल्यांदाच मान्यता देण्यात आली आहे. लडाखमधील मद्यविक्रीचा विस्तार करण्यासाठी ई-लिलावाच्या माध्यमातून 20 नवीन दारू दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. यापूर्वी दारूची विक्री मुख्यतः लेह शहरापुरती मर्यादित होती. आता नुब्रा, चांगथांग, शाम आणि झांस्करसारख्या भागांमध्येही अधिकृतपणे मद्य उपलब्ध होणार आहे.हॉटेलमधील नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत.
 
 
 
यापुढे हॉटेलच्या खोल्यांमध्ये आणि परिसरात मद्यपान करण्यास परवानगी असेल. याआधी ही सुविधा केवळ बारपुरती मर्यादित होती. तसेच खाजगी समारंभ, बँक्वेट हॉल आणि पार्टी हॉलमध्येही ठराविक परवानगी घेऊन मद्य देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. प्रशासनाने परवाना प्रक्रियाही सुलभ केली आहे. परवाना मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली असून मंजुरीची प्रक्रिया अधिक वेगवान करण्यात आली आहे. त्याचबरोबर मद्याच्या विक्रीत पारदर्शकता आणण्यासाठी सुरक्षा होलोग्राम प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे. एमआरपीपेक्षा जास्त दराने मद्य विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असून परवाना रद्द करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.