पुणे
Supriya Sule पुणे शहर आणि जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत तसेच भेसळयुक्त दारूच्या सेवनामुळे झालेल्या दुर्दैवी घटनेत २२ नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार आणि गृह विभागावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीबाबत त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून तातडीने स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील २०० आमदारांची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले.
भोर परिसरातील एका जुन्या Supriya Sule घटनेचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, एका तरुणीच्या हत्येनंतर मुख्यमंत्री स्तरावर आरोपींना कठोर शिक्षा होईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळाले नसल्याचे त्या म्हणाल्या. पुणे शहर ‘क्राईम कॅपिटल’ बनत असल्याचा आरोप करत त्यांनी कायदा व सुव्यवस्था यंत्रणेवर थेट हल्ला चढवला.पुण्यातील प्रशासकीय व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवताना सुळे यांनी म्हटले की, शहराच्या प्रथम नागरिकाला म्हणजेच महापौरांना एखाद्या गंभीर घटनेची माहिती प्रसारमाध्यमांतून मिळणे ही गंभीर बाब आहे. ही स्थिती प्रशासकीय समन्वयातील ढिलाई दर्शवते, असेही त्यांनी नमूद केले. भेसळयुक्त दारूच्या प्रकरणात उत्पादन शुल्क विभाग आणि गृह विभाग या दोघांचीही जबाबदारी निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली.या प्रकरणात झालेल्या मृत्यूंसाठी थेट प्रशासकीय हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत, संबंधित दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा, जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.