ईडी अधिकारी सत्यव्रत कुमार यांची अचानक निवृत्ती

    दिनांक :31-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Satyavrat Kumar's Retirement अंमलबजावणी संचालनालयात अनेक मोठ्या आणि देशभर गाजलेल्या आर्थिक घोटाळ्यांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावणारे विशेष संचालक सत्यव्रत कुमार यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सेवेत अद्याप सुमारे ११ वर्षांचा कालावधी शिल्लक असतानाही त्यांनी अचानक हा निर्णय घेतल्याने प्रशासकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भारतीय महसूल सेवेच्या २००४ बॅचचे अधिकारी असलेले सत्यव्रत कुमार २०१३ पासून ईडीमध्ये कार्यरत होते. मुंबई युनिटमध्ये दीर्घकाळ काम करताना त्यांनी देशातील अनेक हाय-प्रोफाइल आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांचा तपास हाताळला. सध्या त्यांची नियुक्ती सिलीगुडी येथे होती.
 
 
Satyavrat Kumar
 
मुंबईत त्यांच्या कार्यकाळात त्यांनी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याशी संबंधित सुमारे १२,५०० कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय विजय मल्ल्याशी संबंधित ९,२०० कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्याचा तपासही त्यांच्या देखरेखीखाली पार पडला.महाराष्ट्रातील राजकीय व आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित अनेक प्रकरणांमध्येही ते चर्चेत राहिले. नवाब मलिक यांची अटक, अनिल देशमुख प्रकरण तसेच खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारांच्या तपासातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांचे नाव ईडीच्या महत्त्वाच्या कारवायांशी जोडले गेले होते.
 
 
अंडरवर्ल्ड आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांशी संबंधित प्रकरणांमध्येही त्यांनी तपास केला आहे. इक्बाल मिर्ची प्रकरण, येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग चौकशी तसेच महादेव ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणातही त्यांचा सहभाग राहिला आहे.सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांची कोलकाता येथे विशेष संचालक म्हणून बदली झाली होती. त्याआधी त्यांना २०२६ पर्यंत सेवा मुदतवाढ मिळाली होती. मात्र नंतरच्या प्रशासकीय निर्णयांनुसार त्यांचा कार्यकाळ कमी करून त्यांना मूळ कॅडरमध्ये परत पाठवण्यात आले होते. देशातील अनेक संवेदनशील आर्थिक गुन्ह्यांच्या तपासाशी जोडलेल्या या वरिष्ठ अधिकाऱ्याने अचानक स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्याने त्यांच्या निर्णयामागील कारणांबाबत चर्चांना उधाण आले आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.