निधीचा गैरवापर झाल्याचा उबाठा शिवसेनेचा आरोप
चक्क तीन दिवसांत सारे काम पूर्ण
झरीजामणी,
shala -anganwadi swachchhata झरी तालुक्यात जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीसाठी स्वच्छतागृहाची कामे करण्यात आली. मात्र हे बांधकाम घाईगडबडीत, धोकादायक पद्धतीने कमी व खर्चात, निकृष्ट दर्जाचे असून या कामाची चौकशी करून ठेकेदार व अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी उबाठा शिवसेनेने केली आहे. शाळा व अंगणवाडीकरिता स्वच्छतागृहाच्या बांधकामासाठी झरी तालुक्यासाठी शासनाचा 4 कोटींचा निधी मंजूर आहे. 40 शौचालय बांधकामांना मंजुरी मिळाली असून प्रत्येक शौचालयासाठी 4 लाख निधी आहे.
shala -anganwadi swachchhata ही कामे ठेकेदारांकडून करण्यात येत आहे ते बांधकाम नियम धाब्यावर बसवून थातुरमातुर पद्धतीने सुरू आहे. येदलापूर शाळेचे काम गडबडीत आटोपण्याच्या नादात चक्क तीनच दिवसात स्लॅबचे सेंटरिंग काढण्यात आले आहे. हे बांधकाम अतिशय घाई गडबडीत धोकादायक होत असतानाही अभियंता मात्र प्रत्यक्ष येवून कामाची पाहणी करताना दिसत नाही. चार लाखांचे बजेट असताना केवळ निकृष्ट साहित्य वापरून दीड ते दोन लाखांत बांधकाम करून संगनमताने निधी हडपण्याचा उद्योग सुरू असून संबंधित अधिकारी ठेकेदार व अभियंता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन गटविकास अधिकारी रवींद्र सांगळे यांना तालुकाप्रमुख सतीश आदेवार, दयाकर गेडाम, अशोक पंदरे, बाळू दुधकोहळे, शेख हसन शेख सत्तार यांनी दिले आहे.