तर आयपीएल फायनल उद्या!

    दिनांक :31-May-2026
Total Views |
अहमदाबाद,
So, the IPL final is tomorrow! इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या अंतिम सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले असताना अहमदाबादमधील हवामानाने चाहत्यांची चिंता वाढवली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील विजेतेपदाच्या लढतीपूर्वी हवामान विभागाने गुजरातच्या काही भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित अंतिम सामन्यावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे.रविवारी सकाळपासून अहमदाबादमध्ये उष्णतेची तीव्रता जाणवत असून तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. मात्र वातावरणातील अचानक होणारे बदल आणि काही भागांत पावसाचा अंदाज यामुळे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, सामन्याच्या वेळेत पावसाची शक्यता कमी असली तरी बदलत्या वातावरणामुळे कोणत्याही क्षणी परिस्थिती बदलू शकते.
 
 
 IPL final
 
यापूर्वीही आयपीएलच्या अंतिम सामन्यांवर पावसाचा परिणाम झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे यंदाच्या अंतिम सामन्याबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकतेसोबतच धाकधूक निर्माण झाली आहे. आयोजकांनी मात्र कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. पावसामुळे खेळात व्यत्यय आल्यास सामन्याच्या षटकांमध्ये कपात केली जाऊ शकते. निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांनी किमान पाच-पाच षटके खेळणे आवश्यक राहणार आहे. परिस्थिती अनुकूल नसल्यास रात्री उशिरापर्यंत सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
 
 
जर रविवारी एकही चेंडू टाकणे शक्य झाले नाही, तर स्पर्धेच्या नियमानुसार राखीव दिवशी म्हणजेच 1 जून रोजी सामना खेळवण्यात येईल. मात्र राखीव दिवशीही खेळ होऊ शकला नाही, तर स्पर्धेच्या गुणतालिकेतील स्थानाच्या आधारे विजेता निश्चित केला जाईल. दरम्यान, गुजरात टायटन्सने मागील काही हंगामांतील चढ-उतारांनंतर दमदार पुनरागमन करत अंतिम फेरी गाठली आहे. दुसरीकडे, गतविजेत्या आरसीबीने संपूर्ण हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करत पुन्हा एकदा विजेतेपदाच्या उंबरठ्यावर मजल मारली आहे. त्यामुळे मैदानावरील संघर्ष जितका रंगतदार ठरणार आहे, तितकीच नजर आता अहमदाबादच्या हवामानावरही लागून राहिली आहे.