अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणात ५ आरोपी अटकेत

    दिनांक :31-May-2026
Total Views |
सोनारपूर,
The Abhishek Banerjee Attack Incident पश्चिम बंगालमधील सोनारपूर परिसरात तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून राजकीय वातावरणही तापले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारातील पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी अभिषेक बॅनर्जी सोनारपूर येथे गेले असताना त्यांच्यावर जमावाने हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये तपन मैती आणि आकाश यांचा समावेश असून हे दोघे घटनेशी संबंधित व्हिडिओमध्ये दिसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.
 
 

Abhishek Banerjee 
 
या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. तृणमूल काँग्रेस प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या हल्ल्यासाठी भारतीय जनता पक्षाला जबाबदार धरले आहे. मात्र भाजपने हे सर्व आरोप फेटाळले असून प्रकरणाला राजकीय रंग दिला जात असल्याचे म्हटले आहे.दरम्यान, अभिषेक बॅनर्जी यांच्या आरोग्याबाबतही विविध चर्चा सुरू असताना बेल व्ह्यू क्लिनिकने त्यांचा वैद्यकीय अहवाल जारी केला आहे. अहवालानुसार, त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसून छातीवर किरकोळ मार लागल्याचे निदर्शनास आले आहे. तपासणीवेळी ते पूर्णपणे शुद्धीवर आणि स्थिर अवस्थेत होते, तसेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही. डॉक्टरांनी खबरदारी म्हणून त्यांना आवश्यक औषधे आणि सलाईन देण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.