वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

    दिनांक :31-May-2026
Total Views |
मोटेगाव जंगल परिसरातील घटना

चिमूर, 
Tiger attacks तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या आणि तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मोटेगाव येथील कक्ष क्रमांक 38 मध्ये बकर्‍या चारायला गेलेल्या गुराख्याला वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना 31 मेला सकाळी 10 वाजता दरम्यान घडली. मोटेगाव येथील गुराखी दिलीप जानबा ननावरे (45) हे नेहमीप्रमाणे मोटेगाव ते पेंढरी मार्गावारील बद्री पहाडीच्या खाली कक्ष क्र 38 मध्ये सकाळीच बकर्‍या चराईसाठी गेले होते. यावेळी मोठया पट्टेदार वाघाने हल्ला चढवत ननावरे यांना जागेवरच ठार केले आणि 500 मीटर दूर ओढत नेऊन संपूर्ण कपडे फाडून जंगलातील लाईनवर नेऊन ठेवले.
 
 
nanaware
 
वाघाने हल्ला केला तेव्हा 15 ते 20 च्या संख्येनी असणार्‍या बकर्‍या सैरावैरा पाळल्या आणि घरी परत आल्या. बकर्‍या घरी परत आल्या, मात्र वडील घरी आले नाही म्हणून मुलाने वडिलांना फोन केला. पण उत्तर आले नाही. तेव्हा मुलगा काही लहान मुलांना घेऊन जंगल परिसरात वडिलांना शोधायला गेला असता, घटनास्थळी त्यांना वडिलांचे फाटलेले कपडे आणि कुर्‍हाड आढळून आली. तेव्हा सर्व मुले गावात पळत आले आणि घटनेचा सविस्तर वृत्तात गावात सांगितला. गावातील तरुण मुले आणि गावकर्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि संपूर्ण परिसर पिंजून काढले असता, मृत्यूदेह घटनास्थळावरून 500 मीटर दूर अंतरावर आढळून आला.
 
 
Tiger attacks  या घटनेची माहिती वनविभागाला कळताच तात्काळ एसीएफ महेश गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी अनुप कन्नमवार, वनरक्षक केशव पाटील, संभाजी वडझें, बाळकृष्ण नागरे व वनविभागाची संपूर्ण चमू व चिमूर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी उप जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतक ननावरे यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आहे. या घटनेमुळे मोटेगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, तात्काळ उपाययोजना करून वाघाचा बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे घटनेनंतर वनविभागाने मृतकाच्या कुटूंबियांना तातडीची 50 हजाराची आर्थिक मदत प्रदान केली असून, उर्वरित अनुदानाची रक्कम नियमानुसार लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.