मुंबई
Tumbadchi Manjula ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाच्या टीझरनंतर चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटासह या चित्रपटातील अजून एका गोष्टीची चर्चा रंगली आहे. ती म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या खास विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे मकरंद अनासपुरे यांच्या भूमिकेची. लोकप्रिय अभिनेता मकरंद अनासपुरे पुन्हा एकदा नव्या आणि लक्षवेधी अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटात ते एका साधूच्या भूमिकेत झळकणार असून त्यांच्या या लूकची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
चित्रपटातील त्यांच्या Tumbadchi Manjula गेटअपने पहिल्याच नजरेत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लांब केस, दाट दाढी, कपाळावर ठसठशीत टिळा, गळ्यात माळा आणि अंगावर पारंपरिक वेशभूषा असा साधूचा अवतार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. साधूची भूमिका असली तरीही त्यांच्या मिश्कीलपणाची व खुमासदार अंदाजाची झलक टीझरमध्ये दिसून येते. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांची सहजता आणि देहबोलीमुळे या व्यक्तिरेखेला एक वेगळाच रंग मिळाला आहे.
या चित्रपटात जितेंद्र जोशी, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, रीलस्टार अथर्व रुके, नवोदित अभिनेत्री प्रियल नाईक आणि उषा नाडकर्णी हे कलाकार आहेत. ऋषिकेश तुरई यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विविध कोरगांवकर या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने केले आहे. झी स्टुडिओजतर्फे उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या ५ जून रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.