तंबाखूमुक्त समाजासाठी एनसीसी छात्र सैनिकांचा चित्रकला उपक्रम

    दिनांक :31-May-2026
Total Views |
देवळी, 
'World No Tobacco Day' जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त २१ महाराष्ट्र एनसीसी बटालियन, वर्धा अंतर्गत स्थानिक एस. एस. एन. जे. महाविद्यालयातील एनसीसी भवन येथे तंबाखूच्या सेवनाने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयावर पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तंबाखूच्या व्यसनामुळे होणारे गंभीर आरोग्यविषयक दुष्परिणाम समाजापर्यंत पोहोचवून जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
 
 
tobaco
 
स्पर्धेत एनसीसी छात्र सैनिकांनी आपल्या कल्पकतेच्या आणि कलात्मकतेच्या माध्यमातून तंबाखूच्या सेवनामुळे होणारे कर्करोग, हृदयरोग, श्वसनविकार तसेच इतर आरोग्यविषयक समस्या प्रभावीपणे चित्रित केल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रांद्वारे तंबाखूमुक्त जीवनाचा संदेश देत नागरिकांना व्यसनमुतीचे आवाहन केले. स्पर्धेतील उत्कृष्ट पोस्टरकरिता प्रथम पुरस्कार कॅडेट वैष्णवी चौधरी, द्वितीय कार्पोरल आरती मरघडे तर तृतीय पुरस्कार कॅडेट रश्मी मडावी तसेच प्रोत्साहनपर पुरस्कार चांद पोहणे व वंशिका इकोणकर यांना देऊन एनसीसीच्या स्मृतीचिन्हाने सन्मान करण्यात आला. परीक्षक म्हणून सार्जंट वैष्णवी कन्नाके हिने काम पाहिले.
 
 
 
'World No Tobacco Day'  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनिता सोनारे तर प्रमुख अतिथी म्हणून एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जागरूक राहून समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. सोनारे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे सांगितले. यावेळी नुकत्याच संपन्न झालेल्या तामिळनाडू राज्यातील उटी येथील ऑल इंडिया निलगिरी ट्रेक यशस्वीपणे पूर्ण करणार्‍या सार्जेंट स्नेहा मडकाम हिला प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. संचालन अंडर ऑफिसर कल्याणी लिखार हिने तर कॅडेट साक्षी पारिसे हिने आभार मानले.