युक्रेनच्या झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला

आयएईएकडून गंभीर इशारा

    दिनांक :31-May-2026
Total Views |
कीव,
Zaporizhzhia Nuclear Power Plant युक्रेनमधील झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थाचे महासंचालक राफेल ग्रॉसी यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत अणुऊर्जा केंद्रांवर होणारे हल्ले अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी अशा घटनांना आगीशी खेळ असे संबोधत सर्व पक्षांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. आयएईएच्या माहितीनुसार, हा ड्रोन प्रकल्पातील एका टर्बाइन इमारतीवर आदळला असून त्यामुळे इमारतीच्या भिंतीचे नुकसान झाले आहे. प्रकल्प प्रशासनाने हल्ल्याची माहिती संस्थेला दिली असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आयएईए पथकाने परवानगी मागितली आहे.
 
 
atik
 
ही घटना एप्रिल 2024 नंतर पहिल्यांदाच प्रकल्पाच्या संरक्षित परिसरात झालेला ड्रोन हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक असलेला झापोरिझिया प्रकल्प मार्च 2022 पासून रशियाच्या ताब्यात आहे.दरम्यान, रशियाच्या सरकारी अणुऊर्जा कंपनी रोसाटॉमने दावा केला आहे की हा हल्ला युक्रेनियन ड्रोनद्वारे करण्यात आला. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ड्रोन युनिट 6 च्या टर्बाइन भागावर आदळला आणि स्फोट झाला, मात्र मुख्य अणुऊर्जा उपकरणांना कोणतेही गंभीर नुकसान झालेले नाही. प्रकल्प प्रशासनानेही या हल्ल्याला अत्यंत बेजबाबदार कृती असे म्हटले असून अणुऊर्जा केंद्रांवरील अशा हल्ल्यांमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.