- सहा महिन्यांपासून कंत्राट कर्मचार्यांचे मानधन रखडले
- आजपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनाचा इशारा
गोंदिया,
Zilla Parishad Gondia पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचार्यांचे गेल्या सहा महिन्यांपासून मानधन अदा करण्यात आले नाही. त्यामुळे थकीत मानधन तत्काळ अदा करावे, या मागणीसाठी उद्या 1 जूनपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील सर्व कर्मचारी सहभागी होणार असून, तसे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर यांना देण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारपासून जि.प.च्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे कामकाज थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Zilla Parishad Gondia राज्यातील पंचायत समितीअंतर्गत पाणी व स्वच्छता विभागात कार्यरत गट समन्वयक व समूह समन्वयक अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. मात्र, डिसेंबर 2025 पासून आतापर्यंत तब्बल सहा महिन्यांचे मानधन अद्याप मिळाले नाही. त्यामुळे कर्मचार्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. घरखर्च, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च आणि दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले असल्याची व्यथा कर्मचार्यांनी निवेदनातून मांडली आहे. यापूर्वीही वरिष्ठ अधिकार्यांकडे वारंवार तोंडी व लेखी पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने मिळाली. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. दरम्यान, प्रलंबित संपूर्ण मानधन तत्काळ कर्मचार्यांच्या बँक खात्यात जमा करावा, मानधनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, वेतनाचा प्रश्न येत्या 30 मे पर्यंत निकाली काढण्यात आला नाही तर 1 जूनपासून गटसंसाधन केंद्रातील कर्मचारी पूर्ण वेळ कामबंद आंदोलनात सहभागी होतील, असा इशारा देण्यात आला आहे. त्यात 30 तारीख लोटूनही मानधन झाले नसल्याने सोमवारपासून कामबंद आंदोलन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.