चंद्रपूर,
tadoba on buddhist purnima ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात 1 मे 2026 रोजी, बुद्ध पौर्णिमेला निसर्गानुभव आयोजित करण्यात आला. व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव वैविध्याचा आढावा घेण्यासाठी वनविभागाकडून निसर्गप्रेमींच्या मदतीने ही मोहीम राबवली जाते. त्यात वार्षिक ‘मचाण गणना’ही पार पडली असून, कोअर आणि बफर अशा दोन्ही क्षेत्रांत मिळून एकूण 5 हजार 765 वन्यप्राण्यांच्या दर्शनाची नोंद झाली आहे.
यावर्षीच्या गणनेचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रशासकीय यंत्रणेसोबतच सामान्य नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात 99 मचानींवर 201 वनकर्मचारी तैनात होते. तर, बफर क्षेत्रात 69 मचानींंची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे, बफर क्षेत्रातील 54 मचानीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया राबवण्यात आली, ज्याद्वारे 210 निसर्गप्रेमी या थरारक अनुभवाचे साक्षीदार झाले.
प्राप्त झालेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, ताडोबाच्या जंगलात शाकाहारी प्राण्यांची संख्या लक्षणीय असून, ती एकूण नोंदीच्या 53.6 टक्के (3,089 दर्शन) इतकी आहे. यामध्ये सर्वाधिक दर्शन चितळ 1745, सांबर 623 आणि गवा 547 यांचे झाले. ही आकडेवारी प्रकल्पातील भक्ष्यसाखळी अत्यंत मजबूत असल्याचे निदर्शक आहे.
व्याघ्र प्रकल्पाचा मुख्य आकर्षण असलेल्या वाघांचे एकूण 42 वेळा दर्शन झाले. यात कोअर क्षेत्रात 19 आणि बफर क्षेत्रात 23 वाघ दिसले. बिबट्यांचे दर्शन 13 वेळा झाले असून, त्यातील 8 नोंदी बफर क्षेत्रात झाल्या आहेत. याव्यतिरिक्त अस्वल 80, रानकुत्रा 74 आणि विविध प्रकारचे मांजर व सिव्हेट यांचीही नोंद करण्यात आली. जलाशयांच्या काठी पक्ष्यांचीही मोठी रेलचेल पाहायला मिळाली. एकूण 573 पक्ष्यांच्या नोंदी झाल्या, ज्यात 516 भारतीय मोरांचा समावेश आहे. तसेच रानडुक्कर 480, निलगाय 81, भेकर 89, राखी लंगूर 1020, ससा 71, राखी जंगली कोंबडी 57 आणि मगरींचेही दर्शन झाले.
ताडोबात ‘भक्ष्य-भक्षक’ साखळीचे उत्तम संतुलनः शुक्ल
कोअर क्षेत्रात 3 हजार 952, तर बफर क्षेत्रात 1 हजार 813 प्राण्यांची नोंद झाली. ही आकडेवारी केवळ प्राण्यांची संख्या दर्शवत नाही, तर ताडोबातील ‘भक्ष्य-भक्षक’ साखळीचे संतुलन आणि सुदृढ अधिवास स्पष्ट करते.tadoba on buddhist purnima या मोहिमेतून मिळालेली माहिती भविष्यातील वन्यजीव संवर्धन, अधिवास व्यवस्थापन आणि दीर्घकालीन नियोजनासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असे मत ताडोबाचे क्षेत्र संचालक प्रभू नाथ शुक्ल यांनी व्यक्त केले आहे.