आंबेडकरनगर,
8 people crushed by speeding car उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यातील जलालपूर परिसरात घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या दुर्दैवी घटनेत अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी धावून गेलेल्या लोकांनाच भरधाव कारने चिरडल्याने आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची जोरदार धडक झाली होती. या अपघातात जखमी झालेले लोक रस्त्यावर पडले होते. आवाज ऐकून परिसरातील नागरिक तात्काळ मदतीसाठी धावून आले आणि जखमींना उचलून रुग्णालयात नेण्याची तयारी सुरू केली. मात्र याचवेळी वेगाने येणारी एक अनियंत्रित कार थेट त्या जमावात घुसली आणि मदत करणाऱ्या लोकांनाच जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत अनेकजण गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात हलवले, मात्र त्यापैकी सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर काही जखमींवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण परिसराचा ताबा घेत तपास सुरू केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मृतांमध्ये कैफी, उत्तम कुमार, आदित्य कुमार, लालचंद, राजू गुप्ता आणि छोटू यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे, तर उर्वरित दोघांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मदतीला धावलेल्या निष्पाप लोकांवर ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.