हॉलिवूडचा ज्येष्ठ अभिनेते ब्यू स्टार यांचे निधन

    दिनांक :04-May-2026
Total Views |
व्हँकुव्हर,
Actor Beau Star passes away जगप्रसिद्ध चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ब्यू स्टार यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या जाण्याने मनोरंजनविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. २४ एप्रिल २०२६ रोजी कॅनडातील व्हँकुव्हर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली असून त्यांचे पुत्र आणि अभिनेते माईक स्टार यांनी दुःख व्यक्त करत वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली.
 
भिनेते ब्यू स्टार
 
 
ब्यू स्टार यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक लक्षवेधी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप निर्माण केली होती. विशेषतः गुन्हेपट आणि थरारपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना भावल्या. काही गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. याशिवाय दूरचित्रवाणीवरील विविध मालिकांमधूनही त्यांनी आपली अभिनयाची ताकद दाखवून दिली.
न्यूयॉर्कमध्ये १९४४ साली जन्मलेल्या ब्यू स्टार यांनी सुरुवातीला क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडवण्याचा प्रयत्न केला. काही काळ त्यांनी फुटबॉलशी निगडित संघांमध्ये सहभाग घेतला. मात्र नंतर त्यांनी अभिनयाची वाट निवडत चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि अल्पावधीतच स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच सहकलाकार, चाहते आणि चित्रपटसृष्टीतील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. सामाजिक माध्यमांवर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात असून त्यांच्या अभिनयकौशल्याची आठवण काढली जात आहे. विविध भूमिकांमधून त्यांनी केलेले योगदान दीर्घकाळ स्मरणात राहणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.