ज्येष्ठ अभिनेते सुदेश कुमार काळाच्या पडद्याआड

    दिनांक :04-May-2026
Total Views |
मुंबई,
actor Sudesh Kumar passes away हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते सुदेश कुमार यांचे वयाच्या ९५ वर्षी निधन झाले आहे. त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कन्येने दिली असून या दुःखद बातमीमुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुदेश कुमार यांनी मुख्य भूमिका असो किंवा व्यक्तिरेखात्मक भूमिका, त्यांनी प्रत्येक पात्राला न्याय देत आपली वेगळी छाप उमटवली. कारकिर्दीच्या सुरुवातीला ते पृथ्वी थिएटरशी जोडले गेले होते आणि याच रंगभूमीच्या अनुभवामुळे त्यांच्या अभिनयात विशेष खोली निर्माण झाली होती.
 
 

Actor Sudesh Kumar 
आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. छोटी बहन, सारंगा, रॉकेट गर्ल, पैसे, तसेच ‘धरती’, ‘वारिस’, ‘खानदान’ आणि ‘मन मंदिर’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. ते राज कपूर यांच्या अनेक महत्त्वाच्या चित्रपटांशीही जोडले गेले होते आणि त्यांच्या कामात त्यांनी मोलाचे योगदान दिले. अभिनयाबरोबरच त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही हात आजमावला. दो बदन या चित्रपटात त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले होते. त्यांच्या कलेमुळे अनेक चित्रपटांना वेगळी उंची मिळाली. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एका महत्त्वाच्या पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.