पुणे,
Anger over Nasrapur case पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या भीषण घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित मुलीच्या वडिलांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत कुटुंबाला धीर दिला आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा विश्वास व्यक्त केला. या संवादादरम्यान शिंदे यांनी घडलेली घटना अत्यंत अमानुष आणि वेदनादायक असल्याचे सांगत आरोपीला जगण्याचा अधिकार नसल्याचे मत व्यक्त केले. यावर पीडितेच्या वडिलांनीही ठाम भूमिका मांडत आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. त्यांनी इतर राज्यांमध्ये घेतल्या जाणाऱ्या कठोर निर्णयांचा उल्लेख करत महाराष्ट्रातही तशीच कडक भूमिका घेतली जावी, असे स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत न्याय मिळवण्यासाठी सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी यासाठी प्रकरण जलदगतीने चालवले जाईल आणि कोणतीही कायदेशीर पळवाट उरू दिली जाणार नाही. न्यायव्यवस्थेच्या चौकटीत राहूनच कठोर निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला. आरोपीला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर परिसरात आंदोलने झाली, रस्ते रोखून निषेध व्यक्त करण्यात आला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आली.