बारामतीत पवारांचा जलवा, राहुरीत भाजपचा झेंडा

    दिनांक :04-May-2026
Total Views |
पुणे,
Baramati and Rahuri Assembly by-elections बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या मतमोजणीला सकाळी सुरुवात होताच दोन्ही मतदारसंघांतील राजकीय चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच दोन्ही ठिकाणी आघाड्यांचे कल ठळकपणे समोर आले असून निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राहुरी मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या फेरीतच त्यांनी हजारो मतांची आघाडी निर्माण करत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकला. पुढील फेऱ्यांमध्ये ही आघाडी आणखी वाढत गेली आणि तिसऱ्या फेरीअखेर त्यांनी मोठ्या फरकाने आघाडी कायम ठेवली. राष्ट्रवादीच्या गोविंद मोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके हे मागे पडल्याचे चित्र दिसत आहे. टपाल मतमोजणीतही कर्डिले आघाडीवर असल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. इतकेच नव्हे तर निकाल जाहीर होण्यापूर्वीच पुण्यात त्यांच्या विजयाचे अभिनंदन करणारे फलक लावण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
 
 
 
Baramati
सुनेत्रा पवार यांना भक्कम आघाडी
बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीपासूनच भक्कम आघाडी घेतली आहे. टपाल मतांपासूनच त्यांनी आघाडी मिळवली आणि पुढील फेऱ्यांमध्ये ती सातत्याने वाढवत नेली. पहिल्या फेरीतच हजारो मतांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत त्यांनी आपली पकड अधिक मजबूत केली आहे. या निवडणुकीत मोठा विरोधक नसल्याने त्या विक्रमी मताधिक्याने विजयी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतदारसंघातील एकूण मतदानाच्या पार्श्वभूमीवर नवीन विक्रम प्रस्थापित होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.