तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
babanrao-sarolkar : बंगालमधील हिंदुत्व विचारांचा आज झालेला ऐतिहासिक विजय ही केवळ सुरुवात आहे. नक्षलवाद आणि नंतर हिंदुविरोधी कारस्थानांनी त्रस्त वंग भूमीत ‘सर्वेऽपि सुखिन: सन्तु’ हा विचार घेऊन चालणाऱ्या हिंदुत्व विचारधारेला या प्रदेशात उत्तम व्यवस्था लावावी लागेल. त्या अर्थाने ‘खेला शेष’ अशी प्रतिक्रिया आहे, बंगालमध्ये नऊ वर्षे संघाचे प्रचारक राहिलेले यवतमाळातील ज्येष्ठ संघ स्वयंसेवक बबनराव सारोळकर यांची. बंगालमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बांकुडा लोकसभा क्षेत्रातून निवडून खासदार आणि पुढे केंद्रात मंत्री झालेले सुभाष सरकार हे आठवण ठेवून थेट बबनरावांच्या यवतमाळातील घरी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येऊन गेले होते. तोच धागा घेऊन सोमवार, 4 मे रोजी बंगालमध्ये भाजपाचे दणदणीत बहुमतातील सरकार आल्यानंतर त्यांची भेट घेतली असता त्यांनी आनंद व्यक्त केला.

1970 ते 1979 अशी नऊ वर्षे बांकुडा येथे दामोदर उपाख्य बबनराव सारोळकर संघाचे जिल्हा प्रचारक होते. भाऊराव देवरस यांच्या आवाहनावरून बंगालमध्ये संघकार्य केलेल्या सारोळकर यांना गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, सुदर्शनजी आणि विद्यमान सरसंघचालक मोहनजी भागवत या सर्वांचा सहवास लाभला.
आपल्या बंगालमधील कामादरम्यानच्या आठवणींना उजाळा देताना बबनराव म्हणाले, जिथे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार वैद्यकीय शिक्षणासाठी गेले, त्या योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या भूमीत कम्युनिस्ट राज्यकर्त्यांच्या काळात नक्षलवाद फोफावला आणि कम्युनिस्टांचा पाडाव झाल्यानंतर ममता बॅनर्जींच्या कार्यकाळात हिंदू विरोधाला धार चढली. या अनाचारी सरकारांच्या अत्याचारातून मुक्तीचा हा दिवस आहे.
बांकुडा जिल्हा आणि परिसरातील सर्वांशी 83 वर्षीय बबनरावांचा आजही नित्य संपर्क आहे. संघ प्रचारकांच्या असंख्य पिढ्या जिथे खपल्या, ज्यांनी बलिदान दिले, त्या सर्वांचा आठव करीत बंगालच्या या त्रस्त भूमीत सर्वसमावेशक हिंदुत्वाचा विचार कसा रुजेल याविषयी सतत चिंतन सुरू असते.
आज बंगालमध्ये कमळ फुलत असताना निश्चितच आनंद आहे, मात्र ही केवळ सुरुवात आहे. या भूमीमध्ये सर्वांचे कुशल, मंगल, कल्याण करणाèया योजना आणि त्यांची अंमलबजावणी करणे हे मोठं आव्हान असेल. संघाची प्रेरणा मानणाèया या सरकारच्या हातून ते निश्चितच पेलल्या जाईल असा आशावादही बबनराव सारोळकर यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.