नवी दिल्ली,
BJP's big leap in Bengal पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सकाळी दहा वाजेपर्यंतचे चित्र समोर आले असता भारतीय जनता पक्षाने स्पष्ट आघाडी घेत बहुमताचा टप्पा ओलांडल्याचे दिसत आहे. एकूण २९३ जागांपैकी सुमारे १४९ जागांवर आघाडी घेत पक्षाने सत्ता स्थापनेच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला १४८ जागांचा आकडा त्यांनी पार केल्याने राज्यात सत्तांतराची शक्यता बळावली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस मात्र जवळपास ९२ जागांवरच आघाडीवर दिसत असून या निकालामुळे त्यांना मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे.

या निवडणुकीसाठी राज्यात दोन टप्प्यांत मतदान झाले होते. २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान पार पडले होते, तर काही मतदान केंद्रांवर अनियमिततेच्या तक्रारींमुळे २ मे रोजी फेरमतदान घ्यावे लागले होते. दक्षिण चोवीस परगणा जिल्ह्यातील काही केंद्रांवर पुन्हा मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. दरम्यान, काही ठिकाणी गंभीर अनियमितता, यंत्रांमध्ये छेडछाड आणि हिंसाचाराच्या तक्रारी समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाने एका मतदारसंघातील मतदान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पुढील काळात मतदान होणार आहे. उर्वरित सर्व जागांवरील मतमोजणी सुरू असून लवकरच अंतिम चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.