चंद्रपूर,
chandrapur crime पत्नीने 1 लाख रुपयांची सुपारी देवून पतीची हत्या घडवून आणल्याची खळबळजनक घटना भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथे उघडकीस आली. या प्रकरणी पत्नीसह चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दिपमाला रवींद्र कुळमेथे (42, रा. कृषी नगर, वरोडा, जि. चंद्रपूर), वर्षा राजू परचाके (47, रा. लवकुश नगर, मानेवाडा, नागपूर), सोनु उर्फ प्रविण नरेन्द्र कालोकर (31, रा. दाहोदा, ता. रामटेक, जि. नागपूर), नाझीर नसरूल अंसारी (28, रा. चिचभवन, अमरावती रोड, कळमेश्वर फाटा, नागपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
2 मे रोजी घोडपेठ येथील कर्मवीर शाळेजवळ, हनुमान मंदिराशेजारी एका व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, मृताची ओळख रवींद्र तुळशिराम कुळमेथे (46, रा. मुधोली चेक, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) अशी झाली. प्राथमिक तपासात हा अकस्मात मृत्यू वाटत असला, तरी सखोल चौकशीत धक्कादायक सत्य समोर आले.
मृतकाची पत्नी दिपमाला कुळमेथे हिनेच पतीच्या खुनासाठी वर्षा परचाके, सोनु उर्फ प्रविण कालोकर व नाझीर अंसारी यांना 1 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपींनी 1 मे रोजी मृतकाला कारमध्ये बसवून घोडपेठ येथील सुनसान जागेत नेले व कारमध्येच त्यांचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह घटनास्थळी टाकून आरोपी पसार झाले. भद्रावती पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्त कारवाई करीत, आरोपी दिपमाला कुळमेथे व वर्षा परचाके यांना वरोडा येथून, तर आरोपी सोनु उर्फ प्रविण कालोकर व नाझीर अंसारी यांना नागपूर येथून अटक केली.chandrapur crime आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती कंपनीची कार व तीन भ्रमणध्वनी जप्त केले. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, वरोडाचे उप विभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोबरे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, सहायक पोलिस निरीक्षक बलराम झाडोकार, पोलिस उप निरीक्षक सर्वेश बेलसरे व निबोडकर आदींनी केली.