केरळमध्ये काँग्रेसची मुसंडी

    दिनांक :04-May-2026
Total Views |
थिरुअनंतरपूरम,
Congress's plan in Kerala देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे अंतिम कल समोर आले असून केरळ आणि तामिळनाडू वगळता इतर राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाल्याचे चित्र दिसत आहे. या निकालांमुळे देशातील राजकीय समीकरणात मोठे बदल घडत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.केरळमध्ये मात्र काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीने दमदार कामगिरी करत बहुमताचा आकडा पार केला आहे. या आघाडीने तब्बल ९४ जागांवर आघाडी घेतली असून सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. विद्यमान सत्ताधारी डाव्या आघाडीला केवळ ४१ जागांवर समाधान मानावे लागत असून भारतीय जनता पक्षाला या राज्यात अत्यंत मर्यादित यश मिळाले आहे.
 
 
Congress
 
 
मतमोजणीपूर्वी आलेल्या अंदाजांमध्येही केरळमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवली गेली होती. त्या अंदाजांनुसार डाव्या आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही, असे भाकीत करण्यात आले होते. आता प्रत्यक्ष निकालांमधून तोच कल स्पष्ट होत असल्याचे दिसत आहे.या निकालांमुळे डाव्या पक्षांचा देशातील प्रभाव आणखी कमी झाल्याचे मानले जात आहे. पूर्वी पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा यांसारख्या राज्यांमध्ये दीर्घकाळ सत्ता राखणाऱ्या डाव्या आघाडीला आता एकाही राज्यात सत्ता राखता आलेली नाही, असे चित्र समोर आले आहे.
 
 
केरळमधील या निवडणुकीत विविध घटक पक्षांनी मिळून संयुक्त लोकशाही आघाडी मजबूत केली असून काँग्रेस, भारतीय संघ मुस्लिम लीग, केरळ काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दुसरीकडे डाव्या आघाडीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि काही इतर घटक पक्षांचा समावेश होता.या निकालांमुळे देशाच्या राजकारणात नव्या बदलांची सुरुवात झाल्याचे मानले जात असून पुढील काळात राजकीय समीकरणे अधिक बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.