डिजिटल जनगणनेला जोरदार प्रतिसाद

पहिल्याच दिवशी ८ हजारांहून अधिक नागरिकांची स्व-नोंदणी

    दिनांक :04-May-2026
Total Views |
पुणे
Digital Census भारताच्या १६ व्या जनगणना प्रक्रियेला १ मेपासून सुरुवात झाली असून, पुणे जिल्ह्यात पहिल्याच दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यात ८ हजारांहून अधिक नागरिकांनी स्व-गणना पूर्ण केल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी दिली आहे. या प्रतिसादामुळे डिजिटल जनगणनेच्या या नव्या टप्प्याला चांगली सुरुवात मिळाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
 

Digital Census India 2026, self enumeration census India, Pune census 2027 participation, 
जनगणना कायदा १९४८ अंतर्गत राबविण्यात येणारा हा राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा उपक्रम असून, धोरणनिर्मिती आणि विकास नियोजनासाठी अचूक माहिती संकलन हा यामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यात १ मे रोजी जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यास प्रारंभ झाला आहे. नागरिकांना [https://se.census.gov.in](https://se.census.gov.in) या अधिकृत संकेतस्थळावर १५ मे २०२६ पर्यंत स्व-गणना पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया ऐच्छिक असून, त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन माहिती संकलन करणार आहेत.यंदाची जनगणना ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाच्या अंतर्गत पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबविण्यात येत असून, भारतीय जनगणनेच्या इतिहासात प्रथमच नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कुटुंबातील एक सदस्य साधारण १५ ते २० मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण करू शकतो. माहिती भरल्यानंतर स्व-गणना आयडी तयार होऊन तो नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा ई-मेलवर पाठवला जातो. या प्रक्रियेसाठी कोणतेही कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, Digital Census  जिल्ह्यात सुमारे १३ हजार प्रगणक आणि पर्यवेक्षकांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आले असून, पाच-स्तरीय प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. डेटा सुरक्षिततेसाठी बहुस्तरीय सायबर सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असून, केवळ अधिकृत कर्मचाऱ्यांनाच प्रणालीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
केंद्र सरकारने यापूर्वी कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर २०२१ मध्ये होणारी जनगणना पुढे ढकलली होती. आता २०२७ मध्ये ही प्रक्रिया राबवली जात असून, यंदा प्रथमच ती पूर्णपणे डिजिटल स्वरूपात तसेच जातींच्या नोंदींसह केली जाणार आहे.पुणे जिल्ह्यात मिळालेल्या सुरुवातीच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आगामी दिवसांत अधिकाधिक नागरिक या प्रक्रियेत सहभागी होतील, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.