अचलपूर,
fire-in-timber-market : परतवाडा शहरातील गजबजलेल्या जयस्तंभ चौक परिसरात रविवार, ३ मे रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास लाकूड बाजारात भीषण आग लागून संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. ‘आदर्श प्लायवुड’ या दुकानातून सुरू झालेल्या आगीने काही क्षणातच शेजारील आणखी तीन दुकानांना वेढा घातला आणि बघता बघता चारही दुकाने ज्वाळांच्या तांडवात सापडली. या आगीत मोठ्या प्रमाणावर लाकूड, प्लायवुड, फर्निचर साहित्य व इतर ज्वलनशील वस्तू जळून खाक झाल्याने करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हा परिसर पूर्णपणे ज्वलनशील साहित्याने भरलेला असल्याने आगीने काही मिनिटांतच विक्राळ रूप धारण केले. सागवानी व आडजाती लाकडांचे साहित्य, प्लायवुड शीट्स आणि केमिकलयुक्त साहित्यामुळे आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडत होत्या. धुराचे प्रचंड लोट दूरवरूनही दिसत होते. या भीषण दृश्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच अचलपुर पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले. परिसरातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिसरातील सर्व रस्ते बंद केले आणि गर्दीवर नियंत्रण ठेवले.
घटनास्थळी तहसीलदार, पोलिस प्रशासन, महसूल विभागाचे अधिकारी तसेच तलाठी उपस्थित होते. आग नेमकी कशामुळे लागली याचे ठोस कारण अद्याप समोर आलेले नसले तरी शार्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.