देशाची आर्थिक सत्ता मूठभर लोकांच्या हाती एकवटली

माजी सरन्यायाधीश भूषण गवई

    दिनांक :04-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
bhushan-gavai : देशाची राज्यघटना कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा मोठी आहे. यातून देशात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समानता संविधानाला अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत देशाची आर्थिक सत्ता ही मूठभर लोकांच्या हाती एकवटली आहे, असे प्रतिपादन माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. शनिवारी संध्याकाळी स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ येथे जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळा अनावरणप्रसंगी बोलत होते.
 
 
y4May-Anavaran
 
न्या. गवई पुढे म्हणाले, राज्यघटनेतील तत्त्व आणि वडील दादासाहेब गवई यांची शिकवण मी नेहमीच आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. देशाचा सरन्यायाधीश म्हणून खुर्चीवर बसलो असताना शेवटच्या घटकाला डोळ्यापुढे ठेवून काम करत राहिलो. झुडपी जंगलाचा गंभीर प्रश्न हाताळताना पर्यावरणाची हानी होणार नाही व तेथे वास्तव्य किंवा शेती करणारे शेतकरी-शेतमजूर यांचाही हक्क डावलला जाणार नाही, असा समतोल राखत निर्णय दिला. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. इतकेच नव्हे तर अनेक सिंचन प्रकल्प, शाळा, रुग्णालये, घरे बांधकामाचा मार्ग यातून मोकळा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा आणि प्रमुख पाहुणे म्हणून उच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर, यवतमाळ जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती वृषाली जोशी, पालकमंत्री संजय राठोड, आमदार बाळासाहेब मांगुळकर, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य अ‍ॅड. आशिष देशमुख, नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके, यवतमाळचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे, माजी आमदार कीर्ती गांधी, विद्या प्रसारक मंडळाचे सचिव सीए प्रकाश चोपडा, कार्यकारिणी सदस्य किशोर दर्डा, वरिष्ठ अधिवक्ता अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, डॉ. ललित निमोदिया, अ‍ॅड. पंकज ओसवाल, प्राचार्य डॉ. विजेश मुनोत उपस्थित होते.
 
 
डॉ. विजय दर्डा यांनी स्वागतपर भाषणातून विद्या प्रसारक मंडळाद्वारे संचलित विधी महाविद्यालय व अमोलकचंद महाविद्यालयाच्या एकूण वाटचालीची माहिती दिली. न्यायमूर्ती अनिल किलोर, पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्वेता शेलगावकर यांनी केले तर सीए प्रकाश चोपडा यांनी आभार मानले.
ज्येष्ठ विधीज्ञ व न्यायाधीशांचा गौरव
 
 
याच महाविद्यालयात शिकलेले माजी विद्यार्थी नागपूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा, कोल्हापूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल, चंद्रपूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म, भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मो. नासीर मो. सलीम यांचा माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
 
यासोबतच विधी क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणारे यवतमाळचे ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. अमरचंद दर्डा, अ‍ॅड. रामप्रसाद मनक्षे, अ‍ॅड. प्रवीण जानी, अ‍ॅड. दीपक भालेराव, अ‍ॅड. पी. व्ही. गाडबैले, अ‍ॅड. पी. एस. साबळे, अ‍ॅड. जगदीश वाधवानी, अ‍ॅड. दीपक ठाकरे यांचा शाल, शीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.