खरिपाच्या नियोजनात हयगय खपवली जाणार नाही : आ. वानखेडे

*अधिकार्‍यांना दिले कडक निर्देश

    दिनांक :04-May-2026
Total Views |
आर्वी, 
sumit-wankhede : आगामी खरीप हंगाम २०२६ च्या पृष्ठभूमीवर शेतकर्‍यांना कोणत्याही अडचणी येऊ नये. बियाने विक्री, जलसिंचन, पीक विमा आदीसह शेतकरी संबंधीत कोणत्याची कामात हयगय खपवून घेतल्या जाणार नाही, अशा कडक सुचना आ. सुमित वानखेडे यांनी आर्वीत विशेष आढावा बैठकीत दिल्या. बैठकीच्या सुरुवातीलाच त्यांनी कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना निर्देश देताना बाजारात बोगस बियाण्यांची विक्री करणार्‍यांवर तात्काळ बंदी घालून त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करावी.
 
 
 
SUMIT
 
 
 
शेतकर्‍यांना दर्जेदार बियाण्यांचा पुरवठा वेळेत आणि समतोल प्रमाणात होईल, याची सर्वस्वी जबाबदारी कृषी विभागाने स्वीकारावी. पीक विमा आणि शेतकरी अपघात सुरक्षा योजनेची एकही फाईल प्रलंबित राहू नये, अशा कडक सूचना त्यांनी दिल्या. जलसंधारणाच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट करत आमदार वानखेडे यांनी मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकार्‍यांना पोकरा योजनेंतर्गत विहीर पुनर्भरण आणि जलसंधारणाची कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच जलतारा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवण्यासाठी शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करावी, असेही त्यांनी बजावले. विद्युत विभागाच्या अधिकार्‍यांशी संवाद साधताना आ. वानखेडे यांनी प्रलंबित असलेल्या कृषी सोलर पंपांची प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे आदेश दिले. आधुनिक तंत्रज्ञान आणि सूक्ष्म सिंचनाचा प्रसार करण्यासाठी कृषी विभागाने क्षेत्रीय स्तरावर काम करा, असे निर्देशही आ. वानखेडे यांनी दिले.