मुंबई,
King Shivaji's record-breaking राजा शिवाजी हा चित्रपट एक मे रोजी प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळवत धडाकेबाज कमाई करत आहे. रितेश देशमुख यांच्या दिग्दर्शनातील या चित्रपटाने अल्पावधीतच चित्रपटगृहांमध्ये आपली छाप पाडली असून सर्वत्र त्यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक होत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने चांगली कमाई करत दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या तीन दिवसांतच देशभरात तब्बल चाळीस कोटी रुपयांहून अधिक कमाई झाली असून प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे ही कमाई पुढे आणखी वाढण्याची शक्यता आहे. रविवारीही चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी कायम राहिली आणि तिसऱ्या दिवशीही चित्रपटाने कोट्यवधींचा गल्ला जमवला.

या चित्रपटाची खास बाब म्हणजे मराठी आवृत्तीला प्रेक्षकांचा अधिक प्रतिसाद मिळत आहे. मराठीतील कमाईने आघाडी घेतली असताना हिंदी आवृत्तीनेही चांगली कामगिरी करत आपले स्थान निर्माण केले आहे. एकूणच चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता तो विक्रमांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट दिसते. या भव्य चित्रपटात जिनिलिया देशमुख यांच्यासह संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, फरदीन खान, भाग्यश्री, सचिन खेडेकर, अमोल गुप्ते आणि जितेंद्र जोशी यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीतील आधीचे विक्रम मोडले आहेत. सैराट आणि वेड यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांनाही मागे टाकत त्याने नवीन उच्चांक गाठला आहे. तसेच लय भारी या चित्रपटाच्या एकूण कमाईलाही मागे टाकत ‘राजा शिवाजी’ने मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास घडवण्याची चिन्हे दाखवली आहेत.