बंगालमध्ये सत्तेचा संग्राम, ममता पिछाडीवर; सुवेंदू आघाडीवर!

    दिनांक :04-May-2026
Total Views |
कोलकाता,
Kolkata TMC Result पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. प्रारंभीच्या कलांमध्ये सत्तांतराचे संकेत दिसत असून सत्ताधारी पक्षाला कडवी टक्कर मिळत असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाच त्यांच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भवानीपूर मतदारसंघात मागे पडावे लागल्याचे दिसत असून यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नंदीग्राममध्येही भाजपचे सुवेंदू अधिकारी आघाडीवर असून त्यांनी हजारो मतांनी पुढे जात आपली ताकद दाखवली आहे. भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन्ही ठिकाणी त्यांची आघाडी कायम असल्याने तृणमूल काँग्रेससाठी ही चिंतेची बाब मानली जात आहे. एकूणच राज्यभरात दोन्ही पक्षांमध्ये काट्याची टक्कर सुरू असून जागांच्या संख्येत फारसा फरक नसल्याने अंतिम निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
 
 
सुवेंदु आघाडीवर
 
दरम्यान, मतमोजणीदरम्यान सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात असून काही ठिकाणी किरकोळ तणावाची स्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रवेश नियमांवरून दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींमध्ये वाद झाल्याचेही वृत्त आहे. तरीही एकूण प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.याचवेळी तमिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम आघाडी मजबूत स्थितीत असून इतर पक्ष त्यापेक्षा मागे असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये अद्यापही कोणता पक्ष सत्ता स्थापन करणार याबाबत निश्चितता आलेली नसून पुढील काही तासांत चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.