पुणे
Krushi Mitra Yojana राज्यातील शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन वेळेत मिळावे आणि ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने राज्य सरकारने ‘कृषी मित्र’ योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करत प्रत्येक गावात एक ‘कृषी मित्र’ नियुक्त करण्याचा मानस व्यक्त केला.
या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात सुमारे ११ हजारांहून अधिक कृषी मित्रांची नियुक्ती करण्यात येणार असून ही प्रक्रिया जिल्हास्तरावर पार पाडली जाणार आहे. हे कृषी मित्र स्थानिक शेतकऱ्यांशी थेट संपर्कात राहून त्यांना शेतीविषयक सल्ला, सरकारी योजनांची माहिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबत मार्गदर्शन करतील.
भरणे यांनी सांगितले की,Krushi Mitra Yojana प्रत्येक कृषी सहाय्यक अधिकाऱ्यासोबत कृषी मित्र कार्यरत राहील. शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य माहिती मिळावी, यासाठी ही व्यवस्था प्रभावी ठरेल. या पदासाठी निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना दरवर्षी १८ हजार रुपये मानधन देण्यात येणार असून ते त्रैमासिक स्वरूपात दिले जाईल. योजनेसाठी पात्रता निकषही निश्चित करण्यात येणार आहेत. समाजकार्याची आवड, शेतीविषयक अनुभव, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची तयारी आणि संवाद कौशल्य या गुणांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच या भरतीमध्ये महिलांना सुमारे ३० टक्के प्राधान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान, ही योजना जून महिन्यापासून प्रत्यक्षात आणण्याचा सरकारचा मानस असून, शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाच्या योजना अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी ही योजना रोजगाराची नवी संधी ठरणार असल्याचेही भरणे यांनी स्पष्ट केले. राज्यातील कृषी व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या अडचणी त्वरित सोडवण्यासाठी ‘कृषी मित्र’ योजना महत्त्वाची ठरेल, असा विश्वास कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.