तभा वृत्तसेवा
आर्णी,
ladki-bhahin-yojana : आर्णी तालुक्यातील सावळीसदोबा सर्कल व इतर भागातील अनेक महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून वंचित आहेत. केवायसी करूनही त्या वगळल्या गेल्याने राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणारी मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ योजना सध्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
शासनाने मोठ्या गाजावाजात सुरू केलेल्या या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना थेट आर्थिक साहाय्य देणे हा असला, तरी प्रत्यक्षात अनेक पात्र महिलांना लाभ मिळत असताना तो बंद झाला आहे.
विशेष म्हणजे, अनेक लाभार्थींनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना अपात्र ठरविण्यात आल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. स्थानिक पातळीवर कागदपत्रांची पूर्तता, बँक खात्यांची पडताळणी आणि इतर सर्व अटी पूर्ण केल्यानंतरही लाभ न मिळाल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे.
केवायसी करणारा म्हणतो, बँकेत जाऊन पहा. बँकेत, पैसेच नाहीत, म्हणून साहेब सांगतो. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत तांत्रिक अडचणी, डेटा पडताळणीतील त्रुटी आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव हे मुख्य कारणे असल्याचे सांगितले जात आहे.
परंतु, यामुळे सर्वसामान्य महिलांचा शासनावरील विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. योजनांची घोषणा आणि प्रत्यक्ष लाभ यामधील वाढती दरी ही प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरत आहे. ही योजना घोषणांपुरती मर्यादित राहिली का, असा आरोप महिलांकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याची गरज आहे. पात्र महिलांना वेळेत आणि योग्य लाभ मिळणे ही केवळ अपेक्षा नसून शासनाची जबाबदारी आहे. अन्यथा, लोकाभिमुख योजनांबाबतचा विश्वास कमी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
शासनाने ज्या महिलांची केवायसी करूनही ज्यांना अपात्र केले अशा महिलांना योजनेसाठी पात्र करावे, अशी मागणी परिसरातून केल्या जात आहे.