ग्रामीण भागात गॅसपुरवठ्यात विलंब, ग्राहकांमध्ये नाराजी

    दिनांक :04-May-2026
Total Views |
पुणे
LPG gas आंबेगाव तालुक्यात घरगुती गॅसपुरवठ्याच्या वेळापत्रकात शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरात २५ दिवसांत सिलिंडर उपलब्ध होत असताना ग्रामीण भागातील ग्राहकांना तब्बल ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने समानतेच्या मागणीने जोर धरला आहे.
 

LPG gas supply delay rural India, 
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर गॅसपुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळीतील अडचणी लक्षात घेऊन गॅस कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांपासून नवीन नियम लागू केले आहेत. त्यानुसार शहरी भागात २५ दिवसांच्या अंतराने आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांच्या अंतराने सिलिंडर वितरित केला जात आहे. मात्र या धोरणामुळे ग्रामीण ग्राहकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.तालुक्यात भारत गॅस, इंडियन गॅस आणि एचपी गॅस या प्रमुख एजन्सींमार्फत घरगुती गॅसपुरवठा केला जातो. उपलब्ध माहितीनुसार इंडियन गॅसच्या शहरी ग्राहकांना २५ दिवसांच्या आत ओटीपी पडताळणीनंतर सिलिंडर मिळतो, तर ग्रामीण भागातील एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. एकाच तालुक्यात वेगवेगळ्या नियमांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परिस्थितीवर स्थानिक पातळीवर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पंचायत समिती सदस्य संजय पवळे यांनी ग्रामीण भागातील नागरिकांनाही शहरी भागाप्रमाणे २५ दिवसांच्या आत गॅसपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास महिलांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे
दरम्यान, एलपीजी LPG gas  पुरवठ्यातील जागतिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘रिफिलिंग लॉक-इन पीरियड’ लागू केला असून बुकिंगच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. शहरी भागात रिफिल बुकिंगसाठीचा कालावधी २१ दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे, तर ग्रामीण भागासाठी तो ४५ दिवस निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीपूर्वी बुकिंग केल्यास प्रणाली ती आपोआप स्वीकारत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.या सर्व घडामोडींमुळे आंबेगाव तालुक्यात गॅसपुरवठा धोरणाबाबत असंतोष वाढत असून, प्रशासन आणि कंपन्यांकडून यावर तोडगा कधी निघतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.