मुसळधार पावसाने लखनौ ठप्प; वीजपुरवठा खंडित

    दिनांक :04-May-2026
Total Views |
लखनौ,
Lucknow paralysed by heavy rain उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे आज सकाळी अचानक हवामानात मोठा बदल झाला आणि काही क्षणांतच शहरावर काळोख दाटून आला. सुमारे साडेआठच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली, तर आकाशात काळे ढग दाटल्याने दिवसाढवळ्या रात्रीसारखे वातावरण निर्माण झाले. विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
 
Lucknow
 
वादळी वाऱ्याचा तडाखा इतका प्रचंड होता की शहरातील अनेक भागांत झाडे उन्मळून पडली आणि रस्ते अडले. परिणामी वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली. Lucknow paralysed by heavy rain यासोबतच अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. कार्यालयात जाणारे कर्मचारी तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थीही रस्त्यात अडकून पडले, तर साचलेल्या पाण्यामुळे अनेक भागांत जनजीवन ठप्प झाले.
 
दरम्यान, निगोहन परिसरात रविवारी एका कावळ्याने उच्चदाबाच्या तारेला धडक दिल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याची घटना घडली होती. विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ दुरुस्ती करून जवळपास दोन तासांनंतर वीजपुरवठा पूर्ववत केला. वादळाचा फटका ग्रामीण भागालाही बसला असून मलिहाबाद परिसरातील आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. Lucknow paralysed by heavy rain जोरदार वाऱ्यामुळे कच्चे आंबे मोठ्या प्रमाणात गळून पडले, त्यामुळे बागायतदारांना आर्थिक फटका बसला आहे. रहिमाबाद आणि माल परिसरातही याचा परिणाम प्रकर्षाने जाणवला.
 
हवामान खात्याने आधीच वादळ आणि पावसाचा इशारा दिला होता. तज्ज्ञांच्या मते, पश्चिमेकडील वाऱ्यांचा प्रभाव आणि स्थानिक हवामानातील बदल यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील काही तासांतही अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. Lucknow paralysed by heavy rain प्रशासनाने नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन केले असून झाडे आणि विजेच्या खांबांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
 
याआधीही रविवारी वादळ आणि पावसामुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. गोमतीनगर, चिन्हाट, बीकेटी आणि रहिमाबादसारख्या भागांत अंधार पसरला होता. झाडे कोसळल्याने तारा तुटल्या आणि काही ठिकाणी भूमिगत केबल्समध्ये बिघाड झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. Lucknow paralysed by heavy rain वीज आणि पाण्याच्या समस्येमुळे संतप्त नागरिकांनी काही ठिकाणी उपकेंद्रांवर नाराजी व्यक्त केली.