अर्जुनी मोरगाव
Navegaon Bandh Sanctuary जिल्ह्यातील नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान परिसरात गेल्या तीन दिवसांपासून भीषण वनाग्नी धुमसत असून, संपूर्ण जंगलपट्टा आगीच्या ज्वाळांनी वेढला गेला आहे. हिरव्यागार वनराईने नटलेला हा परिसर सद्या धुराच्या लोटांनी आणि आगीच्या तडाख्याने होरपळत असल्याचे चित्र समोर आले आहे.
Navegaon Bandh Sanctuary नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणारा हा भाग गोंदिया जिल्ह्याची ओळख मानला जातो. जैवविविधतेचा खजिना, पर्यटनाचे प्रमुख केंद्र आणि असंख्य वन्यजीवांचे आश्रयस्थान असलेला हा पट्टा आगीमुळे मोठ्या धोक्यात सापडला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आगीच्या ज्वाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे जळून खाक होत आहेत. धुराच्या लोटांमुळे पक्ष्यांचे आवाज हरवले असून, अनेक पक्ष्यांची घरटी नष्ट झाली आहेत. वन्यप्राणी जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणाच्या शोधात धावत असल्याचे हृदयद्रावक दृश्य दिसून येत आहे. Navegaon Bandh Sanctuary स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित वनविभागाकडून पुरेशी आणि तातडीची उपाययोजना होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा अपुरी पडत असल्याचीही चर्चा आहे. पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, वेळेत योग्य नियंत्रण न मिळाल्यास या वनाग्नीचा परिणाम केवळ वनक्षेत्रापुरता मर्यादित राहणार नसून, संपूर्ण पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता आहे. जैवविविधतेवर याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. वनविभागाने आधुनिक यंत्रणा, मनुष्यबळ आणि आवश्यक साधनसामग्रीच्या मदतीने आगीवर त्वरित नियंत्रण मिळवावे, अशी मागणी जोर धरत आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून मजूरांचे वेतन देण्यात आले नाही. त्यात बफर विभागातील १० मजूर कमी करण्यात आले आहे. त्यामुळे काही मजूरांकडून रागातून हा प्रकार होत असावा, दोन ते तीन दिवसांपासून दरदिवशी जंगल परिसरात आग लावली असून फायर वाचर्स, वनरक्षक, वनपालांकडून दरदिवशी आग विझवली जात आहे. त्याचबरोबर पंचनामा केला जात असून चौकशीत दोषी आढळणार्यांवर कारवाई करण्यात येईल.
- अतुल देवकर, विभागीय वन अधिकारी,(नवेगाव खंड) नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प