लग्न होईल तेव्हा करू

    दिनांक :04-May-2026
Total Views |
मुंबई,
Mukesh Khanna शक्तिमान या गाजलेल्या मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय ठरलेले अभिनेते मुकेश खन्ना सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरील वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. ६७व्या वर्षीही अविवाहित असलेल्या खन्ना यांनी आपली भूमिका मांडली असून, त्यांच्या विधानांची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.
 

Mukesh Khanna 
महाभारत या मालिकेत भीष्म पितामहाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या खन्ना यांनी आपल्या कारकिर्दीत एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या ठाम आणि स्पष्टवक्तेपणामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. यावेळी त्यांनी लग्न न करण्यामागील कारण स्पष्ट करताना, “लग्न ही गोष्ट नशिबाशी जोडलेली असते,” असे मत व्यक्त केले.
एका मुलाखतीत बोलताना खन्ना यांनी सांगितले की, समाजात पुरुषत्वाबद्दल काही रूढ समज प्रचलित आहेत. त्यांनी रवि चोप्रा यांच्यासोबतची एक आठवण सांगितली. “ज्याची अनेक प्रेमप्रकरणे असतात तोच खरा पुरुष,” असे चोप्रा यांनी एकदा म्हटल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, या मताशी असहमती दर्शवत खन्ना म्हणाले की, “मर्दानगी सिद्ध करण्यासाठी अनेक महिलांसोबत संबंध असणे गरजेचे नाही. त्यासाठी इतरही मार्ग आहेत आणि महिलांचा आदर करणे अधिक महत्त्वाचे आहे.”
लग्नाबाबत बोलताना Mukesh Khanna त्यांनी स्पष्ट केले की, “लोकांचा असा समज असतो की, लग्न न केल्यास त्या व्यक्तीला लग्न संस्थेवर विश्वास नसतो. पण माझा या संस्थेवर प्रचंड विश्वास आहे. मात्र, योग्य व्यक्ती भेटणे हे नशिबावर अवलंबून असते. जर माझ्या नशिबात लग्न असते, तर ते आतापर्यंत झाले असते.”ते पुढे म्हणाले की, “ज्या व्यक्तीसोबत माझं लग्न होणार आहे, ती योग्य वेळी माझ्या आयुष्यात येईल. वय ही फक्त संख्या आहे, त्याला मी बंधन मानत नाही.” त्यांच्या या विधानांमुळे ‘या वयातही ते लग्न करणार का?’ असा प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित होत आहे.दरम्यान, खन्ना यांनी चित्रपटसृष्टीतही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. ‘सौगंध’, ‘सौदागर’, ‘यालगार’, ‘मैं खिलाडी तू अनाडी’, ‘राजा’ आणि ‘बरसात’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. अभिनयासोबतच त्यांच्या स्पष्ट मतांमुळे ते नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले असून, त्यांच्या ताज्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.