माय-लेकीच्या आत्महत्येला सासरचे कारणीभूत

नंदनवन पोलिसांत पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :04-May-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
nandanvan-mother-daughter-suicide : नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व्यंकटेशनगर परिसरात १ मे रोजी माय-लेकीने केलेल्या खळबळजनक आत्महत्या प्रकरणात आता नवीन वळण आले आहे. सासरच्या मंडळींकडून होणा-या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून या दोघींनी टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती, सासू-सास-स-यांसह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
 
 
NGP
 
 
 
माहितीनुसार, संगिता श्रीराम ढबाले (५२, व्यंकटेशनगर) आणि त्यांची विवाहित मुलगी आकांक्षा लोकेश ब्रम्हे (२९, ओमनगर, सक्करदरा) या दोघींनी १ मे रोजी संगिता यांच्या राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुरुवातीला या प्रकरणात नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, सखोल चौकशीत सासरच्या छळाची माहिती समोर आली आहे. विलास केशवराव पिसे (४७, माथनी, मौदा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आकांक्षाचे लग्न झाल्यापासून तिचा पती लोकेश सुधाकर ब्रम्हे (३०), सासरा सुधाकर ब्रम्हे (६०), सासू अनुसया ब्रम्हे (४८), नणंद प्राची अमोल डफ आणि अमोल डफ हे सर्वजण संगनमत करून तिचा छळ करत होते. माहेरून पैसे आणण्यासाठी आणि माय-लेकीच्या नावावर असलेली शेतजमीन सासरच्यांच्या नावे करण्यासाठी तिला मारहाण व क्रूर वागणूक दिली जात होती. इतकेच नव्हे तर, आकांक्षाला मुलगा न होता मुलगी झाली आणि ती जन्मानंतर लगेच दगावली, या कारणावरूनही तिचा प्रचंड मानसिक छळ करण्यात आला. या सततच्या त्रासाला आणि हुंड्यासाठी होणा-या छळाला कंटाळून अखेर माय-लेकीने आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांसह हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.