विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यात

-बालेवाडीच 6 ते 8 मे

    दिनांक :04-May-2026
Total Views |
नागपूर,
national-sports-competition : अ. भा. विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या 47 व्या राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती, खो-खो व बास्केटबॉलच्या क्रीडास्पर्धेचे आयोजन बुधवार 6 ते ते शुक्रवार 8 मे पर्यंत पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये करण्यात आले आहे.
 
 
 
NGP
 
 
 
या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, हरियाणा, तेलंगाणा, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली आदी 10 राज्यांतील विविध सरकारी व खाजगी विद्युत कंपन्यांचे सुमारे 538 महिला व पुरुष खेळाडूांचे 41 संघ सहभागी होत आहेत.
 
 
कबड्डी, कुस्ती, खो-खो व बास्केटबॉलमध्ये पुरुष संघात लढत होईल तर कबड्डी व खो-खोमध्ये महिला संघांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील अजिंक्यपदासाठी कबड्डीमध्ये पुरुष व महिला गटातील 18 संघ तर खो-खोसाठी 9 संघ सहभागी होत आहेत. कुस्ती व बास्केटबॉलमध्ये अजिंक्यपदासाठी पुरुष गटामध्ये प्रत्येकी 7 संघांमध्ये लढत होणार आहे.
 
 
विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद््घाटन बुधवारी 6 मे रोजी सकाळी 9.30 वाजता ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्या मुख्य उपस्थितीत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्याच्या क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. महावितरण, महानिर्मिती, महापारेषण कंपनीच्या संचालक मंडळासह अ.भा. विद्युत क्रीडा नियामक मंडळाचे अध्यक्ष जिग्नेश राय, सरचिटणीस नरेश कुमार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
 
 
शुक्रवारी 8 मे रोजी सायंकाळी 5 वाजता अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीवकुमार (महापारेषण), राधाकृष्णन बी. (महानिर्मिती) यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरणाचा कार्यक्रम होईल. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून पुणे प्रादेशिक संचालक सुनील काकडे तसेच उपाध्यक्ष म्हणून मुख्य अभियंता अनिल कोलप (महापारेषण) व अधीक्षक अभियंता अशोक घाडगे (महानिर्मिती), मुख्य समन्वयक म्हणून मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके (महावितरण) व पुरुषोत्तम वारजुरकर (महानिर्मिती) तसेच विविध समित्यांचेे प्रमुख व सदस्य कार्यरत आहेत.