तभा वृत्तसेवा
वणी,
reservation-sub-categorization : राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने वणी उपविभागीय कार्यालयात विविध मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेल्या अलीकडील निर्णयांविरोधात यावेळी तीव्र आक्षेप नोंदवण्यात आले.
महासंघाच्या पदाधिकाèयांनी उपविभागीय अधिकाèयांची भेट घेऊन अनुसूचित जातींमधील आरक्षणाच्या प्रस्तावित उपवर्गीकरण प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली. या प्रक्रियेत सर्व घटकांना समान न्याय मिळावा, तसेच समित्यांच्या अहवालात पारदर्शकता राखावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित समित्यांच्या अहवालाबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नसून समाजातील सर्व घटकांचा पुरेसा सहभाग नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. आर्थिक निकष, सामाजिक स्थिती आणि विविध घटकांचा सखोल विचार करूनच अंतिम निर्णय घ्यावा, असेही निवेदनात नमूद आहे.
यावेळी महासंघाचे मार्गदर्शक गोसावी खोले, संत रवीदास समाजसुधार मंडळ वणीचे अध्यक्ष राजू वाघमारे, जिल्हाध्यक्ष महेश लिपटे, वणी शहर अध्यक्ष सचिव दीपक हांडे, श्याम गिरडकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शासनाने न्याय्य व सर्वसमावेशक निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.