अनिल कांबळे
नागपूर,
assaulted woman एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका विधवा महिलेचा विश्वासघात करून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका पेंटरने या महिलेला आपल्या जाळ्यात ओढले आणि लग्नाची मागणी केल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चेतन अरुण भाले (२६, एमआयडीसी) असे आरोपीचे नाव आहे.

माहितीनुसार, ३५ वर्षीय पीडित महिला एमआयडीसी भागात राहते आणि मजुरी करून आपला उदरनिर्वाह करते. चार वर्षांपूर्वी पतीच्या निधनानंतर ती माहेरी राहत आहे. आरोपी चेतन भाले हा व्यवसायाने पेंटर असून तो आणि पीडिता एकाच ठिकाणी कामाला असल्याने गेल्या वर्षभरापासून एकमेकांना ओळखत होते. या ओळखीचा फायदा घेत आरोपीने ३० एप्रिल २०२५ रोजी पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.assaulted woman त्यानंतर लग्नाचे स्वप्न दाखवून त्याने अनेक महिने महिलेचा शारीरिक छळ सुरू ठेवला. मात्र, जेव्हा पीडितेने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा त्याने तिला लग्नास स्पष्ट नकार दिला. तसेच याबद्दल कोणाला सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. यानंतर पीडितेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी चेतन भाले विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.