तेहरान,
peace in the Iran-US conflict होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात गेले अनेक दिवस निर्माण झालेला आंतरराष्ट्रीय तणाव आता काहीसा कमी होत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे बंदिस्त झालेला हा अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग पुन्हा खुला झाल्याने जागतिक पुरवठा साखळीला मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेमुळे अडकून पडलेली परदेशी जहाजे सुरक्षितपणे बाहेर काढली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईसाठी मोठ्या प्रमाणावर लष्करी तैनाती करण्यात आली असून, समुद्री मार्गावरील नियंत्रण पुन्हा स्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अमेरिकेकडून ही मोहीम जागतिक इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उचललेले पाऊल असल्याचे सांगितले जात आहे. अनेक जहाजांवर अन्नधान्य आणि आवश्यक वस्तूंचा साठा संपत आल्याने परिस्थिती गंभीर बनत होती. या पार्श्वभूमीवर अडकलेल्या जहाजांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक मानला जातो. जगातील मोठ्या प्रमाणातील कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गातून होते. त्यामुळे या मार्गावरील तणावाचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर जाणवत होता. इंधन दरवाढीची भीती आणि पुरवठा अडचणी यामुळे अनेक देश चिंतेत होते.
या घडामोडींमुळे भारतासह अनेक देशांना होणाऱ्या इंधन पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला होता. आता मार्ग काही प्रमाणात मोकळा झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेला दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.दरम्यान, इराणने अद्याप काही अटींवर ठाम भूमिका घेतल्याचे दिसत आहे. काही जहाजांच्या तपासणी आणि कागदपत्रांच्या मुद्द्यावरून वाद कायम असल्याची माहिती आहे. तरीही दोन्ही बाजूंमध्ये चर्चेची प्रक्रिया सुरू असल्याने तणाव कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.