पिंपरी-चिंचवड
Pimpri Chinchwad police action, शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलिसांना देणे बंधनकारक असतानाही या नियमाचे पालन न करणाऱ्या ३८ घरमालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. एप्रिल २०२६ मध्ये राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून संबंधित घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
शहरात अनधिकृत वास्तव्यास असलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, तसेच संभाव्य संशयित हालचालींवर नियंत्रण ठेवणे या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली होती. विशेषतः काही संशयित बांगलादेशी नागरिकांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दहशतवाद विरोधी शाखा (ATB) आणि स्थानिक गुन्हे शाखा (ATC) यांच्या संयुक्त पथकांच्या माध्यमातून व्यापक तपासणी मोहीम हाती घेतली. या तपासादरम्यान अनेक घरमालकांनी भाडेकरूंची आवश्यक माहिती पोलिसांकडे नोंदवली नसल्याचे स्पष्ट झाले.कायदेशीर नियमानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत कोणताही नवीन भाडेकरू ठेवताना त्याची संपूर्ण माहिती स्थानिक पोलिस ठाण्यात देणे बंधनकारक आहे. मात्र या नियमाचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित ३८ घरमालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.या कारवाईमुळे शहरातील घरभाडे व्यवहारांमध्ये कायदेशीर नोंदींचे पालन न करणाऱ्या मालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पोलिसांनी मात्र ही कारवाई केवळ दंडात्मक नसून, शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, Pimpri Chinchwad police action, पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची आवश्यक कागदपत्रे तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करून त्यांची योग्य पडताळणी करून घ्यावी. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, तसेच माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.या कारवाईनंतर पिंपरी-चिंचवड शहरात भाडेकरू पडताळणी प्रक्रियेबाबत अधिक कठोर अंमलबजावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.