राज्यात मान्सूनपूर्व सरींची चाहूल!

    दिनांक :04-May-2026
Total Views |
मुंबई,
Pre-monsoon in maharashtra गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट जाणवत होती. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने चाळिशीचा टप्पा ओलांडला होता आणि सकाळी दहापासूनच कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले होते. अशा परिस्थितीत हवामान खात्याने आता काहीसा दिलासा देणारा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात लवकरच पावसाची सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून काही भागांत मान्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाज आहे. येत्या सात मेपर्यंत राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता असून काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
 

Pre-monsoon in maharashtra 
विशेषतः विदर्भात सात मे पर्यंत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुढील दोन ते तीन दिवसांत जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते, असा अंदाज आहे. मराठवाड्यातही पाच ते सात मेदरम्यान पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र कोकण भागात सध्या पावसाची चिन्हे दिसत नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. अलीकडे नागपूरमध्ये तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते, तर चंद्रपूरमध्येही उष्णतेने उच्चांक गाठला होता. आता या बदलत्या हवामानामुळे पुढील काही दिवसांत उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.