मुंबई
Rahul Roy राहुल रॉय यांच्याबाबत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात असताना, अखेर स्वतः अभिनेत्याने पुढे येत या सर्व अफवांना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. एकेकाळी आशिकी या चित्रपटातून रातोरात स्टार बनलेल्या रॉय यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर पोस्ट शेअर करत आपली भूमिका मांडली आहे.
राहुल रॉय यांनी त्यांच्या बहिणी प्रियंका रॉय आणि मेहुणे रोमीर सेन यांच्यासोबतचा फोटो शेअर करत सध्या ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले. “मी माझ्या बहिणीसोबत राहतो आणि ती माझी उत्तम काळजी घेते. मी स्वतःला जगातील सर्वात नशीबवान भाऊ समजतो,” असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.
गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर त्यांच्या संदर्भात काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. या व्हिडिओंमध्ये त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यावर प्रतिक्रिया देताना रॉय म्हणाले, “हा संदेश त्यांच्यासाठी आहे जे मला ट्रोल करत आहेत किंवा माझ्याविरोधात खोटे व्हिडिओ तयार करून बदनामी करत आहेत. मी पूर्णपणे ठीक आहे. माझ्याकडे राहण्यासाठी घर, घालण्यासाठी कपडे, जेवण आणि प्रवासासाठी वाहन आहे. मी रस्त्यावर आलेलो नाही.”
तसेच, साधे जीवन जगणे ही आपली वैयक्तिक पसंती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “मी कधी कधी ऑटोने प्रवास करतो, कारण ते सोयीचे आणि जलद असते. बॉडीगार्ड ठेवणे किंवा दिखाऊ जीवन जगणे मला आवडत नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
रॉय यांनी आपल्या Rahul Roy कुटुंबाविषयीही भावना व्यक्त केल्या. त्यांचा जुळा भाऊ रोहित रॉय कॅनडामध्ये राहत असून, कामाच्या कारणामुळे गेल्या नऊ वर्षांत त्यांची भेट झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, कोणत्याही माध्यमाला मुलाखत दिलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट करत, भविष्यात चांगल्या संधी मिळाल्यास पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसण्याची इच्छा व्यक्त केली. शेवटी त्यांनी “मी जिवंत आहे” असे ठामपणे सांगत सर्व अफवांना पूर्णविराम दिला.सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अप्रमाणित माहितीमुळे निर्माण होणाऱ्या गैरसमजांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला असून, सेलिब्रिटींनाही अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.