‘राजा शिवाजी’चा विक्रमी ओपनिंग नंतर काही ठिकाणी शो रद्द

    दिनांक :04-May-2026
Total Views |
मुंबई
Raja Shivaji movie रितेश देशमुख आणि सलमान खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या राजा शिवाजी या बहुचर्चित चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत विक्रम नोंदवला आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोठी कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा मानदंड निर्माण केला आहे. विशेष म्हणजे हिंदी आवृत्तीपेक्षा मराठी प्रेक्षकांकडून चित्रपटाला अधिक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
 

Raja Shivaji movie box office collection 
प्रदर्शनाच्या सुरुवातीपासूनच ‘राजा शिवाजी’ची सर्वत्र चर्चा रंगली असून, आठवड्याच्या शेवटी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र, या उत्साहावर काही ठिकाणी पाणी फेरले गेले. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनेकांनी चित्रपट पाहण्यासाठी आगाऊ बुकिंग केले होते, परंतु प्रत्यक्ष चित्रपटगृहात पोहोचल्यानंतर शो रद्द झाल्याची घोषणा करण्यात आल्याने प्रेक्षकांची मोठी निराशा झाली.
 
 
मुंबईतील भारत माता Raja Shivaji movie  टॉकीजसह काही चित्रपटगृहांमध्ये असे प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. प्रेक्षकांनी सांगितले की, त्यांनी बुकिंग अ‍ॅपद्वारे तिकिटे आरक्षित केली होती आणि शोच्या वेळेपूर्वीच चित्रपटगृहात हजेरी लावली होती. मात्र, शेवटच्या क्षणी शो रद्द झाल्याचे कळवण्यात आले. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, व्यवस्थापनाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.चित्रपटगृह व्यवस्थापनाकडून याबाबत स्पष्टीकरण देताना तांत्रिक कारणे आणि वितरकांशी संबंधित अडचणींमुळे शो रद्द करावा लागल्याचे सांगण्यात आले. तसेच संबंधित माहिती बुकिंग प्लॅटफॉर्मला देण्यात आली होती, मात्र ती प्रेक्षकांपर्यंत वेळेत पोहोचली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. या गोंधळामुळे तिकिटांचे पैसे परत मिळणार का, हा प्रश्नही प्रेक्षकांसमोर उभा राहिला आहे.दरम्यान, चित्रपटाच्या कमाईबाबत बोलायचे झाल्यास, ‘सॅकनिल्क’च्या अहवालानुसार तिसऱ्या दिवशी हिंदी आवृत्तीत ४.२५ कोटी रुपयांची कमाई झाली, तर मराठी आवृत्तीत ७.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात चित्रपट यशस्वी ठरला. आतापर्यंत ‘राजा शिवाजी’ची एकूण कमाई ४०.३४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून, पुढील काही दिवसांत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.एकीकडे विक्रमी कमाई आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, तर दुसरीकडे शो रद्द होण्याच्या घटना—या दोन्ही गोष्टींमुळे ‘राजा शिवाजी’ सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला आहे.