मुंबई
Salman Khan सलमान खान यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी झालेल्या गोळीबार प्रकरणात आता न्यायालयीन प्रक्रियेला वेग आला असून, अभिनेत्याच्या खाजगी बॉडीगार्डने विशेष न्यायालयात महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवली आहे. या साक्षीत त्यांनी हा हल्ला थेट सलमान खान यांच्या हत्येच्या उद्देशानेच झाल्याचा गंभीर दावा केला आहे. गेल्या महिन्यात या प्रकरणातील ट्रायलला सुरुवात झाली असून, बॉडीगार्ड हा या प्रकरणातील पहिला साक्षीदार ठरला आहे.
१४ एप्रिल २०२४ रोजी पहाटे दोन अज्ञात बाईकस्वारांनी वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटवर गोळीबार केला होता. साक्ष देताना बॉडीगार्डने सांगितले की, १३ एप्रिलच्या संध्याकाळी तो नाईट ड्युटीसाठी हजर झाला होता. त्या काळात लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून मिळणाऱ्या धमक्यांमुळे अभिनेत्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.
बॉडीगार्डने न्यायालयाला सांगितले की १४ एप्रिल रोजी पहाटे सुमारे ४ वाजता फटाक्यांसारखा आवाज ऐकू आला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर दोन जण मोटरसायकलवर हेल्मेट घालून आलेले दिसले आणि त्यांनी इमारतीच्या दिशेने गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात ४ ते ५ राऊंड फायरिंग करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. गोळीबारानंतर हल्लेखोर ‘आय लव्ह बांद्रा’ पॉईंटच्या दिशेने पळाले आणि पुढे मेहमूब स्टुडिओ रोडकडे वळल्याचेही त्यांनी सांगितले.
घटनेच्या वेळी सलमान खान हे त्यांच्या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये असल्याचेही साक्षीत नमूद करण्यात आले. “हा हल्ला अभिनेत्याला ठार मारण्याच्या उद्देशानेच करण्यात आला होता,” असा ठाम दावा बॉडीगार्डने न्यायालयात केला.
सरकारी वकील महेश मुळे यांनी न्यायालयात सीसीटीव्ही फुटेज सादर केले, ज्यामध्ये हल्लेखोर मोटरसायकलवर येताना दिसत आहेत. उलट तपासणीदरम्यान बचाव पक्षाचे वकील विरल बब्बर यांनी विचारलेल्या प्रश्नावर बॉडीगार्डने गोळीबाराच्या वेळी आपण सिक्युरिटी केबिनमध्ये असल्याचे स्पष्ट केले.
या प्रकरणातील एका पोलिस Salman Khan साक्षीदारानेही न्यायालयात सांगितले की, तो घटनेच्या वेळी लॉबीमध्ये होता, मात्र त्याने प्रत्यक्ष गोळीबार पाहिला नाही. मात्र घटनास्थळी गोळ्यांच्या रिकाम्या पुंगळ्या आढळल्याची माहिती त्याने दिली.दरम्यान, या प्रकरणात विकी गुप्ता आणि सागर पाल यांनी बाईकवर येऊन गोळीबार केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या तपासानुसार, मोहम्मद रफीक सरदार चौधरी याने घटनेपूर्वी परिसराची रेकी करून व्हिडिओ तयार केला होता आणि तो फरार आरोपी अनमोल बिश्नोई याला पाठवला होता. या प्रकरणात पाच आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून, अनुज कुमार थापन या एका आरोपीने पोलिस कोठडीत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.या गुन्ह्यात अनमोल बिश्नोई आणि लॉरेन्स बिश्नोई यांना वॉन्टेड आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.