बारामती,
Sunetra Pawar's record in Baramati बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच निर्णायक आघाडी घेतली असून त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. मतमोजणीच्या पंधराव्या फेरीनंतर त्यांना तब्बल एक लाख तेहतीस हजारांच्या आसपास मतांची आघाडी मिळाली असून अजित पवार यांच्या यापूर्वीच्या विक्रमालाही त्यांनी मागे टाकले आहे. अद्याप काही फेऱ्यांची मतमोजणी बाकी असली तरी ही आघाडी इतकी मोठी आहे की विरोधकांसाठी परिस्थिती जवळपास अशक्य बनली आहे.

बारामतीमध्ये यंदा एकूण दोन लाखांहून अधिक मतदान झाले असून त्यातील बहुसंख्य मतदारांनी सुनेत्रा पवार यांना साथ दिल्याचे चित्र समोर येत आहे. त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना मात्र अत्यल्प मते मिळाल्याने काही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजकीय वर्तुळात या विजयाला ऐतिहासिक मानले जात असून महाराष्ट्राच्या निवडणूक इतिहासातील हा सर्वात मोठ्या मताधिक्यांपैकी एक ठरू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. विजयानंतर कोणताही जल्लोष, मिरवणूक किंवा गुलाल उधळू नये असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना केले असून संयम राखण्यावर त्यांनी भर दिला आहे. संपूर्ण मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर अधिकृत निकाल जाहीर होणार असून बारामतीच्या राजकारणात हा निकाल नवा अध्याय लिहिणार असल्याचे मानले जात आहे.