सीतामातेच्या आदर्शानेच महिलांनी आत्मबल वाढवावे : सुनीता गर्ग

    दिनांक :04-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
sunita-garg : भारतीय स्त्री अबला नसून सबला आहे, हे रामायणातील सीतेच्या चरित्रावरून अधोरेखित होते. 14 वर्षांचा प्रदीर्घ वनवास, रावणाकडून अपहरण, राज्याभिषेकानंतर पुन्हा वनवास व अग्निपरीक्षा अशा अनेक प्रसंगांना धीरोदात्तपणे सीतेने स्वीकारले. आपल्या चरित्राने माहेर व सासर दोन्ही कुळांचा गौरव वाढवला; त्या सीतेप्रमाणे आपणही प्रेरणा घेऊन आत्मबल वाढवावे, आपल्या पुत्रांवर लवकुश प्रमाणे संस्कार करावे, असे विचार सुनीता गर्ग यांनी व्यक्त केले.
 
 
y4May-Shriram
 
 
मध्यप्रदेशातील कटनी येथील सुनीता गर्ग विश्व हिंदू परिषद, मातृशक्ती सेवा द्वारे लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात सीतानवमी उत्सवात प्रमुख वक्ता म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी अध्यक्षस्थानी समाजसेवी अलका कोथळे होत्या. मंचावर प्रमुख मातृशक्ती सेवाप्रमुख विशाखा अमरावतकर, सत्कारमूर्ती नंदिनी शिंदे व विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष मनोज औदार्य होते.
 
 
 
सर्वप्रथम मान्यवरांनी श्रीराम पंचायतन व भारतमातेचे पूजन करून दीपप्रज्वलन केले. सर्व मान्यवरांचे रोपटे देऊन विशाखा अमरावतकर, रश्मी तिवारी, कावेरी कुळकर्णी, मेघा भेंडारकर यांनी स्वागत केले. अनुपमा कुळकर्णी यांनी वैयक्तिक गीत सादर केले. प्रियांका खांदवे यांनी प्रास्ताविकातून प्रमुख वक्ता व सत्कारमूर्ती नंदिनी व संदीप शिंदे आणि नंददीप फाऊंडेशनच्या सेवाकार्याचा परिचय करून दिला. त्यानंतर सुनीता गर्ग व विशाखा अमरावतकर यांनी संदीप व नंदिनी शिंदेचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
 
 
अध्यक्षीय भाषणात अलका कोथळे म्हणाल्या, सीतामाईंनी प्रतिकूल परिस्थितीतही आपला आत्मसन्मान कायम ठेवला. अग्निपरीक्षेतही यशस्वी होऊन त्या कुंदन ठरल्या. त्यांच्या जीवनापासून खूप शिकण्यासारखे आहे. भारतमातेची व सीतेची आरती झाल्यावर प्रसाद वितरण झाले. संचालन मनीषा राजे व आभारप्रदर्शन विनीता गद्रे यांनी केले.